दखल – अनुभवांची शिदोरी
Marathi July 05, 2026 08:25 AM

>>आकाश भोरडे

मानवी जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला सतत छोटय़ा-मोठय़ा घडामोडी घडत असतात. त्यातून अनेकदा काही ना काही आपल्याला शिकायला मिळत असते. मात्र हे आलेले अनुभव लिखित स्वरूपात मांडणे सर्वांनाच शक्य होत नाही. वास्तविक आयुष्यात आलेल्या प्रसंगांना कल्पनेची झालर देत त्यांना शब्दरूपात मांडण्याचे कसब प्रा. कुंडलिक कदम यांनी ‘समासातल्या नोंदी’ या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर आणले आहे. लेखक प्रा. कुंडलिक कदम यांचे हे तिसरे पुस्तक असून यापूर्वीही त्यांच्या शिदोरी व लग्नाचा बार या पुस्तकांना वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुणे जिह्यातील पुरंदर येथील लपतळवाडी गावचे व सध्या तळेगाव ढमढेरे येथे पेशाने शिक्षक असणारे लेखक प्रा. कुंडलिक कदम हे एक उत्तम वाचक आहेत. त्यामुळे त्या वाचनाचा प्रभाव त्यांच्या लेखणीमध्ये नेहमीच दिसून येतो.

समासातल्या नोंदी या पुस्तकातील सर्वच लेख हे समाजातील प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित असून ‘संस्कारांचे कुंपण’ या पहिल्याच लेखात लेखकाने शाळेत शिकणाऱया मुलांना गुरुजींनी जो मोलाचा संदेश दिला त्याचे वर्णन केले आहे. यामध्ये मुलांनी लावलेले झाड बकरीने खाऊ नये म्हणून झाडांना घातलेले कुंपण पाहून गुरुजींनी मुलांना दिलेला संदेश हा प्रेरणादायी आहे. झाडांप्रमाणे माणसांच्या मनालाही संस्काराच्या कुंपणाची गरज कशी आहे हे या लेखात सांगितले आहे. गुरुजींनी विद्यार्थ्यांना दिलेला संदेश जीवनाचे सार सांगून जातो.

त्याचप्रमाणे स्पर्श या लेखामध्ये लेखकाने आई आणि मुलीच्या नात्याचे खुमासदार सुंदर वर्णन केले आहे. आई आपल्यासाठी रात्रंदिवस राबत असते. आपण आजारी असताना रात्रभर जागून औषध पाणी करत असते, परंतु आई आजारी पडल्यावर तिची काळजी घेतली जातेच असे नाही. त्यामुळे आई जेव्हा आजारी पडते तेव्हा आपणही तिची काळजी घेतली पाहिजे, हा संदेश लेखकाने मुक्तासारख्या चिमुकल्या तीन वर्षांच्या मुलीच्या माध्यमातून दिला आहे. तसेच ‘गावाचा पार’ या लेखामध्ये ग्रामीण संस्कृतीतील महत्त्वाचा घटक असणारा आणि गावातील मुख्य ठिकाणी झाडाभोवती असणाऱया पाराचे अतिशय महत्त्वपूर्ण वर्णन या लेखात लेखकाने केले आहे. माणूसपण जपणारा हा पार आता हळूहळू दुर्मिळ होत असून पाराचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे सांगत वृक्ष संवर्धनाचाही महत्त्वपूर्ण संदेश देऊन जातात.

त्याचप्रमाणे समासातल्या नोंदी या पुस्तकात एकूण 44 प्रेरणादायी व अनुभवसंपन्न लेख असून प्रत्येक लेख वाचताना वाचकाला एक महत्त्वाचा व मोलाचा संदेश देतात. समासातल्या नोंदी या पुस्तकातील माणुसकीचा झरा, विचारांची पेरणी, जगण्याची दृष्टी, विचारांची श्रीमंती, दहा रुपये, भाऊबंदकी, चुंबळ, मनीऑर्डरचा खुलासा, दुखवटा, सायकलची घंटी असे अनेक लेखदेखील वाचणीय आहेत.

पुणे येथील परिस पब्लिकेशन यांनी या पुस्तकाची आकर्षक बांधणी केली असून चित्रकार अरविंद शेलार यांनी विषयाला साजेसे असे काढलेले आकर्षक मुखपृष्ठ व आतील प्रसंगानुरूप चित्रे पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकतात. ग्रामीण भागात गेल्या बारा वर्षांपासून दरवर्षी एका वाचकाचा सन्मान करणारे लेखक प्रा. कुंडलिक कदम यांनी आपल्या पुरंदर तालुक्यातील लपतळवाडी या गावच्या मातीला अर्पण केलेले व वाचकाला प्रेरणा देणारे समासातल्या नोंदी हे पुस्तक वाचायलाच हवे.

कंपाऊंड मध्ये नोंदी
लेखक ः प्रा. कुंडलिक कदम
प्रकाशक : परिस पब्लिकेशन, पुणे
एकूण पाने : 150 n मूल्य : 350 रु.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.