परीक्षण – संघर्षमय जीवनाची आदर्श कहाणी
Marathi July 05, 2026 08:25 AM

>> श्रीकांत आंब्रे

ढोर समाजातील प्रसिद्ध ज्येष्ठ मराठी साहित्यिक प्रा. डा. अर्जुन व्हटकर यांच्या संघर्षमय जीवनाचे ‘चलबट’ हे आत्मकथन. ‘चलबट’ म्हणजे मेलेल्या जनावरांच्या कातडय़ाचे आतील मांस. वेगवेगळय़ा प्रक्रियेतून या कातडय़ाला जावे लागते. त्यानंतरच हे कातडे कमावले जाते. मेलेल्या जनावरांच्या कातडय़ाचा धंदा अतिशय घाणीतला आणि दुर्गंधीयुक्त असल्याने गावकुसाबाहेर तो करावा लागतो. लेखक अर्जुन व्हटकर यांना तो शालेय वयापासून करावा लागला. नरकयातना म्हणजे काय हे त्यांना या धंद्यातून अनुभवायला मिळाले. या पिढीजात धंद्यातूनच आजपर्यंत त्यांच्या कुटुंबांची पोटं भरत आली होती. शेती आणि मानवजातीसाठी तसेच विज्ञानयुगातील यंत्रसामुग्रीला लागणाऱया चामडय़ाच्या वस्तू त्यातून बनवल्या जात. काबाडकष्ट करून ढोर समाजाने समाजासाठी केलेल्या प्रामाणिक सेवेचे हे आत्मकथन म्हणजे प्रतीकात्मक रूप आहे.

लेखकाच्या कुटुंबात दारिद्रय़, निरक्षरता पाचवीलाच पूजलेली होती. शिक्षणाचा, सांस्कृतिक जीवनाचा, परिवर्तनाचा, कलेचा कोणताही वारसा, इतिहास या घराला नव्हता. शालेय वयापासून अतिशय हुशार, धीट, बेडर असलेल्या अर्जुनला शाळेत वाचनाची इतकी गोडी लागली की ज्ञानाच्या सागरात तो अक्षरशः डुंबून त्याचा आनंद घेत होता. शिक्षणाशिवाय स्वतःच्या भावंडांचा आणि समाजाचा उत्कर्ष होणार नाही हे त्याच्या लक्षात आले, तेव्हा झपाटल्यासारखा तो जे जे हाती लागेल ते ते वाचू लागला. त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रंदावल्या. बदलाला सामोरे जात स्वतःचे जीवन पणाला लावताना त्यांची झालेली ससेहोलपट आणि सोशिकता त्यांनी या आत्मकथनात उलगडून दाखवली आहे.

उस्मानाबाद जिह्यातील वाशी तालुक्यात पारा या खेडय़ात 22 जून 1958 रोजी जन्मलेल्या अर्जुन व्हटकर यांनी ढोरकीच्या धंद्याने आणि गावशिवारात पडतील ती कामे करून आपला स्वतःचा आणि भावंडांच्या शिक्षणाचा मार्ग खुला केला. एम. ए. झाल्यावर प्रसिद्ध महाविद्यालयात त्यांनी मराठी विषयाचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पीएच.डी.ही मिळवली. उत्तम लेखक, वक्ते, अभिनेते, कथाकथनकार बनले. आपल्या घराण्याला अंधाराच्या गर्तेतून प्रकाशवाटेकडे नेणाऱया या लेखकाने त्यासाठी ज्या यातना भोगल्या त्या ऐकूनच मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा हा जीवनप्रवास किती खडतर, किती कष्टाचा होता त्याची कल्पना या त्यांच्या आत्मकथनाद्वारे येऊ शकेल.

त्यांच्या या जीवनप्रवासाचे प्रामुख्याने तीन भाग आहेत. पुस्तकात त्यांनी तसे ते केलेले नाहीत. पुस्तकात प्रकरणवजा जशा आठवतील तशा सलग आठवणींची उत्कंठामय गुंफण आहे. पण वाचताना जे जाणवते त्यात त्यांच्या बालपणीचा ‘चलबट’ धंद्याचा आणि शालेय जीवनाचा भाग फार विस्ताराने आलेला नाही. दुसरा त्यांच्या कुटुंबातील नाना तऱहेच्या व्यक्तिरेखांचा भाग आहे. तिसरा त्यांच्या एम. ए.पर्यंतच्या शैक्षणिक कारकीर्दीचा, प्राध्यापकी जीवनाचा आणि मराठी साहित्यात ते नावारूपाला कसे आले याचा आलेख आहे.

मुळात या लेखकाचे मन निर्मळ आणि निरागस आहे. माणसांवर प्रेम करणारे आहे. आपल्या गुरुजनांविषयी अपार आदरभाव असणारे आहे, हे वेळोवेळी या आत्मनिवेदनातून दिसते. त्याचा हळवा स्वभाव वेळप्रसंगी अश्रूंना मोकळी वाट करून देतो. जेव्हा माणूस एकाकी पडतो तेव्हा त्याला आधार आणि दिलासा देणाऱया माणसाची साथ लागते. लेखकाला ती पत्नीच्या रूपाने मिळाली. त्याच्याइतकेच दुःख अबोलपणे सोसणारी पत्नी त्यांच्यासारखीच सोशिक असल्यामुळे त्याला साथ देऊ शकली, असे प्रसंग पुस्तकात अनेकवेळा येतात. साहित्यिक जीवनात आणि इतरत्र मानमरातब मिळवणाऱया लेखकाची खरी किंमत जवळच्यांनाच कळत नाही, याची अनेक उदाहरणे लेखक देतो, तेव्हा त्यात संताप नसतो, तर एक हताशपणा असतो.

उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर जिह्यातील लेखकाचा जीवनप्रवास म्हणजे त्याच्या जीवनातील भोगवटा आहे. तरीही तो जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. जीवनात चित्रविचित्र अनुभव आलेला लेखक लेखनातून परिपक्वपणे आपले प्रतिभासामर्थ्य दाखवून जातो. प्रत्येक प्रसंगात लेखकाचे स्वभावविशेष प्रकर्षाने जाणवतात. ज्येष्ठ साहित्यिकांचा त्यांना लाभलेला सहवास यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. मराठी साहित्यात त्याना आदराचे स्थान मिळाले.

हे आत्मकथन त्यांनी कसलाही आडपडदा न ठेवता लिहिले आहे. ग्रामीण बोलीभाषेचा आणि त्यातील सराईतपणे बोलल्या जाणाऱया अपशब्दांचाही योग्य तिथे वापर केला आहे. त्यामुळे हे सगळे प्रसंग जिवंत होऊन डोळय़ासमोर येतात. एखादी कादंबरीच वाचल्याचे समाधान या आदर्श आत्मकथनातून नक्कीच मिळेल. शिरीष घाटे यांचे मुखपृष्ठ व आतील रेखाचित्रे समर्पक आहेत.

इश्कबाज
लेखक : अर्जुन व्हटकर
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन, माहीम
पृष्ठे : 354 n मूल्य ः 400 रु.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.