5 जुलैचा मुहूर्त हुकला, आता कर्जमाफी कधी? महत्त्वाची अपडेट समोर; दत्तात्रय भरणेंनी सगळं सांगितलं
Tv9 Marathi July 05, 2026 07:45 PM

Farmer Loan Waiver : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. या कर्जमाफीचा राज्यातील अनेक शेतकऱ्यांना लाभ होईल, असा दावा राज्य सरकारकडून केला जातोय. या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून लवकरच शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ दिला जाणार आहे. दुसरीकडे ही कर्जमाफी फसवी आहे. कर्जमाफी करताना सरकारने अनेक जाचक अटी लागू केल्या असून त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतोय, असा दावा विरोधकांकडून केला जातोय. सरकारने जाचक अटी मागे घ्याव्यात, या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलनही झाले. दरम्यान, आता कर्जमाफीच्या अटी आणि प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी होणारा विलंब यावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ते पुण्यातील इंदापुरात बोलत होते.

लवकरात लवकर कर्जमाफीची रक्कम…

राज्य सरकारने शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा केली होती. परंतु जुलै महिना सुरू झाला तरीही अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेलाच नाही. राज्य सरकारने 5 जुलै रोजी कर्जमाफी दिली जाईल, असे सांगितले होते. परंतु आता ही मुदतही संपली आहे. दरम्यान, यावरच प्रश्न विचारला असताना दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली. सध्या विधिंमडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पुरवणी मागण्यांमध्ये ज्या काय मागण्या करण्यात आलेल्या आहेत, त्या येथे मंजूर होतील. त्यानंतर राज्यपाल मोदयांची लवकरात लवकर सही होईल. लवकरात लवकर कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे भरणे यांनी सांगितले.

कोणतीही चूक होऊ नये म्हणूनच…

कर्जमाफीचा लाभ गरीब शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. चार दोन दिवस उशीर झाला आहे. उशीर झाला हे आम्ही मान्य करतो. परंतु संपूर्ण माहिती घेऊन शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे. कोणतीही चूक होऊ नये म्हणूनच आम्ही काळजी घेतोय, असेही स्पष्टीकरण दत्तात्रय भरणे यांनी दिले. राज्यातील शेतकऱ्यांनी खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले पाहिजेत, असेही भरणे म्हणाले.

अडचणी लवकरच दूर करून

अडचणीच्या काळामध्ये कोणतीही निवडणूक नसताना सुद्धा अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळाच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. या सर्वांचे शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून, कृषी मंत्री म्हणून मी आभार मानतो. कर्जमाफीसाठी 30 जून तारीख दिली होती. मात्र काही अडचणी असतात. या अडचणी लवकरच दूर करून येणाऱ्या थोड्या दिवसात कर्जमाफीची रक्कम माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाईल, असे आश्वासन यावेळी भरणे यांनी दिले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.