शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता खतांचा तुटवडा दूर होणार, मोठी अपडेट समोर
GH News July 06, 2026 02:10 AM

रसायने आणि खते मंत्रालयाने म्हटले आहे की पश्चिम आशियातील संघर्षाने भारताच्या खतांच्या पुरवठा साखळीवर जास्त परिणाम झाला आहे. देशासाठी खते आणि कच्चा माल आणणारी २० पैकी १५ जहाजे सुरक्षितपणे होर्मुझ स्ट्रेटमधून निघाली आहेत. यात आठ जहाजांवर ३.३२ लाख टन युरिया, चार जहाजात २.५७ लाख टन डीएपी आणि तीन जहाजात १.११ लाख टन सल्फर आहे. हे सर्व निर्धारित वेळेनुसार भारतीय बंदरात येत आहेत. ५ आणखी जहाजे येणार असून ज्यातील एक जहाजात ०.२५ लाख टन अमोनिया आणि दुसऱ्यात ०.४५ लाख टन युरिया आहे.

सध्या आणखी दोन युरिया जहाजांवर आणि एका गंधक जहाजावर माल चढवला जात आहे. सर्व माल नियोजित वेळेनुसार पोहोचेल अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, पश्चिम आशियातील संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक विस्कळीत झाली होती, परंतु वेळेवर नियोजन, उत्तम समन्वय आणि सततच्या देखरेखीमुळे खतांचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. राजनैतिक प्रयत्नांतून पुरवठ्याचे नवीन स्रोतही शोधण्यात आले असल्याचे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

कोणत्या देशातून खतांचा पुरवठा

ओमान, मलेशिया, व्हिएतनाम, जॉर्जिया, नायजेरिया, रशिया, फिनलंड, इजिप्त, अल्जेरिया, तुर्की आणि नेदरलँड्स येथून युरियाच्या पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भारताने डीएपी आणि एनपीके ( नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटेशियम ) रशिया, मोरोक्को, इजिप्त, अमेरिका, जॉर्डन, दक्षिण कोरिया, ट्युनिशिया आणि सौदी अरेबियायेथून अरबी समुद्र ते रेड सीच्या मार्गाने मागवला आहे. केंद्रीय रसायन आणि खते मंत्री जे. पी. नड्डा म्हणाले की, पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम झाला आहे, ज्यामुळे खतांच्या किंमती वाढल्या आहेत आणि निर्यातीसाठी लागणारा वेळ वाढला आहे. या परिणामातून भारतही सुटलेला नाही.

सर्व युरिया कारखाने पूर्ण क्षमतेने कार्यरत

जागतिक स्तरावर किंमती वाढल्या असूनही, सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण केले आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली खत विभागाने उचललेल्या सक्रिय उपाययोजनांमुळे हे शक्य झाले आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या काळात खत कारखान्यांना होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा, जो सुमारे ६५ टक्क्यांनी कमी झाला होता, तो आता पूर्णपणे पूर्ववत झाला आहे. परिणामी, देशभरातील सर्व युरिया कारखाने पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.