राज्यातील अनेक भागात पावसाने धुवांधार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणात तर गेल्या तीन दिवसांपासून धुवांधार पाऊस बरसत आहे. या भागांमध्ये तीन दिवसांपासून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जोरदार पाऊस पडत असल्याने या भागातील धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे या भागात पर्यटनाला जणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. पर्यटन स्थळे गजबजू लागले आहेत. यावेळी अप्रिय घटना घडण्याची शक्यताही आहे. त्यामुळे वन विभाग अॅक्शन मोडवर आला आहे. वन विभागाने पर्यटकांसाठी 10 सूचना केल्या आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
पावसाळी पर्यटनादरम्यान पर्यटकांनी सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन पुणे वन विभागाने केलं आहे. पुणे वन विभागाच्या अखत्यारीतील राजगड, सिंहगड, लोणावळा परिसरासह विविध पर्यटनस्थळांवर पावसाळ्याच्या सध्या सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळणे, दगड घसरणे, झाडांच्या फांद्या तुटणे, तसेच धबधबे, ओढे व नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढणे यांसारखे धोके निर्माण होण्याची शक्यता आहे. पुणे वन विभागने आपल्या क्षेत्रातील पर्यटन स्थळांसाठी या सूचना केल्या असल्या तरी राज्यातील सर्वच पर्यटन स्थळांसाठी त्या लागू आहेत.
* धबधबे, ओढे, नाले आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरू नये.
* दरडप्रवण, घसरडे तसेच कड्यालगतचे धोकादायक भाग टाळावेत.
* धबधब्यांच्या माथ्यावर, कड्यांच्या टोकावर अथवा प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करू नये.
* सेल्फी अथवा छायाचित्रणासाठी जीव धोक्यात घालू नये.
* अतिवृष्टी, दाट धुके किंवा विजांचा कडकडाट सुरू असल्यास पर्यटन टाळावे.
* वन विभागाने लावलेले इशारा फलक, सुरक्षा सूचना व कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे.
* मद्यपान करून पर्यटनस्थळी वावरू नये.
* लहान मुलांवर सतत लक्ष ठेवावे.
* वनक्षेत्रात कचरा टाकू नये तसेच पर्यावरणास हानी पोहोचेल असे कृत्य करू नये.
* वन्यजीवांना त्रास होईल असे वर्तन टाळावे.
पावसाळ्याच्या काळात हवामानात अचानक बदल होऊन धबधबे, ओढे आणि नाल्यांमधील पाण्याची पातळी आणि प्रवाह काही मिनिटांत वाढू शकतो. त्यामुळे पर्यटकांनी विशेष सतर्कता बाळगून जबाबदारीने पर्यटन करावे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, अपघात, मार्ग चुकणे, वनाग्नी, वन्यप्राणी संबंधित घटना अथवा इतर मदतीची आवश्यकता भासल्यास वन विभागाच्या 1926 या टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.
पावसाळा हा निसर्गाचा उत्सव आहे. सर्व पर्यटक, ट्रेकर्स आणि पर्यावरणप्रेमींनी निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यावा; मात्र स्वतःची सुरक्षितता, वनक्षेत्रातील नियम आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी यांचे भान ठेवून जबाबदार पर्यटनाला प्राधान्य द्यावे.