वेल्हे, (पुणे) - दुर्गम अठरा गाव मावळ परिसरातील तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बार्शीमाळ गावाकडे जाणाऱ्या मार्गावरती मोठ्या प्रमाणात डोंगराचा कडा कोसळल्याने या गावाकडे जाणारा वाहतुकीसाठीचा मार्ग बंद झाल्याची घटना मंगळवार (ता. 7) रोजी घडली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती तहसीलदार निवास ढाणे यांनी.
राजगड तालुक्याच्या अठरागाव मावळ परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे परिसरातील अनेक मार्ग बंद झाले असून काही ठिकाणी पुलावरून पाणी जाणे, रस्ता खचने, डोंगराचा भाग कोसळून रस्त्यावर येण्याच्या घटना घडत आहेत. मात्र बार्शी माळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डोंगराचा कडा कोसळून गावाकडे जाणारा वाहतुकीसाठीचा मार्ग बंद झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार निवास ढाणे, जिल्हा परिषद सदस्य तानाजी मांगडे, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, पंचायत समितीचे उपसभापती संदीप खुटवड ,पंचायत समिती सदस्य सिता खुळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पोकलेन मशीन लावून रस्त्यावर आलेला मातीचे, दगडाचे ढीग काढण्यासाठी सूचना देण्यात आले आहेत. या गावातील नागरिकांसाठी वाहतुकीचा मार्ग पूर्ण बंद झाला असून मुख्य रस्त्यास येण्यासाठी त्यांना पायवाटेचा वापर करून सुमारे पाच किलोमीटरची पायपीट करावी लागणार आहे.
याबाबत बार्शी माळचे सरपंच संतोष भुरुक म्हणाले,' शेनवड फाटा ते बार्शी माळ रस्ता अत्यंत खराब झाला असून तो होण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करत असून सुद्धा प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. हा रस्ता झाला असता तर नागरिकांची गैरसोय टळली असती.'