मित्राला वाचवताना दोघेही खदानीत बुडाले; तिघांच्या मृत्यूनं गावावर शोककळा
Saam TV July 08, 2026 03:45 AM
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे खदानीत बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

  • सेल्फी काढताना पाय घसरून पडलेल्या मित्राला वाचवताना आणखी दोघेही पाण्यात बुडाले.

  • मृतांमध्ये 14 ते 17 वयोगटातील तीन किशोरवयीन मुलांचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चोपडा रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या बाजूला असलेल्या खोल पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी पावणेपाच वाजाताच्या सुमारास घडली. खदानीजवळ सेल्फी काढताना पाय घसरून पडलेल्या तरुणाला वाचवताना दोघांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

मुंबईला उद्याही पावसाचा अलर्ट, बुधवारी शाळा-ऑफिस चालू की बंद? व्हायरल मेसेजबाबत BMCकडून मोठा खुलासा

या दुर्घटनेनं संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. तीन मुलं बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तिघांना वाचवण्यात त्यांना यश आले नाही. मानव बंटी रतनानी (वय 14), कार्तिक विकी उधवानी (वय 14) आणि दिनेश विजय पंजवानी (वय 17) अशी मृतांची नावे आहेत. तिन्ही मुले अमळनेरच्या सिंधी कॉलनीमधील रहिवासी होती.

तिन्ही मुले मंगळवारी सायंकाळी पावणे पाच ४.४५ वाजण्याच्या सुमारस खदाणीत गेली होती. खदाणीत एक बेटासारखा उंचवटा असल्याने ते तिघेही त्यावर चढले. एका बाजूला एक फूट पाणी होते. त्या उंचवटावरती उभे राहून एकजण सेल्फी घेऊ लागला होता. त्यावेळी त्याचा पाय घसरला त्याला वाचवायला दुसऱ्याने त्याचा हात धरला मात्र तोही खाली जाऊ लागला म्हणून त्याने तिसऱ्याचा हात धरला. परंतु तिघेही ३० फूट खोल पाण्यात बुडाले. ही घटना एका रिक्षावाल्याच्यानजरेस पडली. तो धावत खाली खदाणीजवळ पोहचला. त्याच्यासोबत असलेल्या एकाने ११२नंबर डायल केला.

Rain Alert : पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, पुढील काही तास महत्त्वाचे; ७ दिवसांत १० जणांचा मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच देवळी येथील व स्थानिक नागरिक आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार सी यु पाटील, शहर तलाठी अशपाक पिंजारी , पोलीस गणेश पाटील ,घटनास्थळी पोहचले. देवळी येथील दीपक मोरे याने पाण्यात उडी मारून तिन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला होता.

तिन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमार्टम आणि इतर कायदेशीर प्रक्रियेसाठी अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पोलीस निरीक्षक निकम ,हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील , कॉन्स्टेबल गणेश पाटील यांनी पंचनामा केला.

मृतांमधील दिनेश हा प्रताप कॉलेजला ११ वी कॉमर्सला शिकत होता. तो दारू दुकानावर काम करायचा. तर मानव हा पीबीए इंग्लिश मिडियम स्कूलला ९ वीमध्ये शिकत होता. त्याचे वडील हॉटेल कामगार आहेत. तर कार्तिक देखील पीबीए स्कूलला ९ वीमध्ये शिकत होता, त्याचे वडील बेकरीत काम करतात. एकाचवेळी ३ मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण अमळनेरमध्ये हळहळ व्यक्त होतेय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.