IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; म्हणाला, हे भयंकर होते...
esakal July 08, 2026 05:45 AM

Shreyas Iyer reaction after India defeat vs ENG 3rd T20I: भारतीय संघाला ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात १२५ धावांनी विजय मिळवताना भारताचा संपूर्ण संघ ७६ धावांत तंबूत पाठवला. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला, यापूर्वी २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ८० धावांनी हार झाली होती. भारताची ही ट्वेंटी-२० क्रिकेटमधील दुसरी निचांक धावसंख्या ठरली. २००८ मध्ये भारत मेलबर्नवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७४ धावांत तंबूत परतला होता. या लाजीरवाण्या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला.

फिल सॉल्ट ( ७०), सॅम कुरन ( नाबदा ४१) व जॉस बटलर ( ३६) यांच्या दमदार खेळीने इंग्लंडला ७ बाद २०१ धावांपर्यंत पोहोचवले. प्रिंस यादव व हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. पण, लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने शरणागती पत्करली. वैभव सूर्यवंशी ( १३) व इशान किशन ( १३) हे भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. भारत ११.४ षटकांत ७६ धावांवर ऑल आऊट झाला. जॉश टंगने ४, जोफ्रा आर्चरने ३, तर आदील राशीदने दोन विकेट्स घेतल्या.

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

भारताने प्रथमच पॉवर प्लेमध्ये पाच विके्टस गमावल्या आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सलग पाच सामन्यांत एकही विजय न मिळवण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरली. भारताने मागील पाच सामन्यांत चार पराभव स्वीकारले, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. यापूर्वी २००९ व २०२१ मध्ये भारत सलग चार सामन्यांत विजयाशिवाय राहिला होता.

या पराभवानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, "हा अत्यंत वाईट पराभव होता. इतक्या मोठ्या फरकाने हरणे अजिबात स्वीकारार्ह नाही. सर्वप्रथम हा पराभव स्वीकारावा लागेल आणि पुन्हा नव्याने तयारीला लागावे लागेल. ही २०० धावांची खेळपट्टी होती, असे मला वाटत नाही. पॉवरप्लेमध्ये आम्ही ५ विकेट्स गमावल्या आणि त्याचाच मोठा फटका आम्हाला बसला."

"सामना सुरू होण्यापूर्वी कितीही योजना आखल्या तरी मैदानावर उतरल्यावर परिस्थितीनुसार स्वतःला बदलावे लागते. मला वाटते आम्ही हार्ड लेंथवर प्रभावी गोलंदाजी करण्यात अपयशी ठरलो. आता या पराभवात अडकून न राहता जोरदार पुनरागमन करणे आवश्यक आहे. प्रत्येक खेळाडूने आत्मपरीक्षण करून संघासाठी अधिक चांगले योगदान कसे देता येईल, याचा विचार करायला हवा," असे तो पुढे म्हणाला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.