अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
जगदीश ढोले July 08, 2026 08:43 PM

Crude Oil Price Hike नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून क्रूड ऑईलच्या दरात घसरण सुरु होती. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी संपल्याचं जाहीर केलं. अमेरिकेनं इराणवर हल्ले केले, त्यानंतर इराणकडून कुवेत आणि इतर ठिकाणी हल्ले करण्यात आले. यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या दरात वाढ झाली. 8 जुलै म्हणजे आज ब्रेंट क्रूडचा दर 5.6 टक्क्यांनी वाढून 78 डॉलर प्रति बॅरल झाला. तर,WTI Crude च्या दरात 5.8 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली, याचा दर 74.55 डॉलर प्रति बॅरल झाला.

अमेरिका इराण पुन्हा संघर्ष 

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या कर्मशिअल जहाजांवर इराणकडून हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर अमेरिकेनं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले. अमेरिकेनं इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीम, किनारपट्टीवरील रडार नेटवर्क, अँटी शिप क्रूझ मिसाईल लाँच पॅडवर हल्ले केले. अमेरिकेनं इराणच्या आयआरजीसीच्या 60 हून अधिक नौका देखील नष्ट केल्या.  

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन कर्मशिअल ऑईल टँकर जहाजांवर हल्ले झाले होते. ज्यामध्ये कतारचा झेंडा असलेल्या रेकय्यातचा समावेश होता. त्यावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला झाला होता. इराणनं त्या हल्ल्यांची जबाबदारी घेतली नव्हती. मात्र, अमेरिकन गुप्तचर संस्थांनी इराणला जबाबदार धरत हल्ले केले. यामुळं आखाती देशांमधील तणाव पुन्हा वाढला आहे. इराणच्या जवळ असलेले कतार आणि बरहीन हे देश सतर्क झाले आहेत. 

अमेरिकेनं इराणसोबतची शस्त्रसंधी संपल्याचं जाहीर केलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणला तेल विक्रीचं दिलेला विशेष लायसन्स रद्द केलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात जूनमध्ये एक करार झाला होता. त्या कराराद्वारे इराणला 21 ऑगस्टपर्यंत तेल विक्रीची परवानगी देण्यात आली होती. अमेरिकन ट्रेझरी विभागाकडून  इराणला देण्यात आलेली तेल विक्रीची सूट रद्द करण्यात आल्याचं म्हटलं.  

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी संपल्याचं जाहीर करताच भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. भारतीय शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. इराणचं तेल आंतरराष्ट्रीय बाजारात आल्यानं क्रूड ऑईलचे दर कमी होतील, असा अंदाज भारताचा होता. इराणचं तेल बाजारात आलं असतं तर देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले असते. मात्र, आता इराणचा परवाना अमेरिकेनं रद्द केल्यानं ती आशा संपली आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील 48 तासांमध्ये स्थिती सुधारली नाही तर क्रूड ऑईलचे दर 80-85 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचतील. भारत एकूण गरजेच्या 85 टक्के तेल आयात करत असल्यानं भारतात देखील इंधनाचे दर महाग होऊ शकतात. भारताला यामुळं विदेशी चलन मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑईल खरेदीसाठी मोजावं लागेल. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.