Gas Cylinder : खारपाडा येथे नदीत व खाडीत सिलिंडरचा पूर; हजारो गॅस सिलिंडर पाण्यात आले वाहून, चक्क बोटीने सिलेंडर काढले बाहेर
esakal July 09, 2026 12:45 AM

पाली - मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा येथे खाडीच्या व नदीच्या वेगवान प्रवाहात अचानक हजारो गॅस सिलिंडर वाहून जात असल्याचे पाहायला मिळाले. पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणारे हे सिलेंडर पाहून स्थानिक नागरिकांनी ते काढण्यासाठी एकच झुंबड केली होती. अनेकांनी चक्क छोट्या होड्या घेऊन जाऊन हे सिलेंडर काढले.

गढूळ पाण्यामध्ये हजारो गॅस सिलिंडर हेलकावे खात धरमतर खाडीच्या दिशेने पुढे वाहून जात होते. हे गॅस सिलेंडर रसायनी येथील एचपीसीएल कंपनीच्या आवारातून पातळगंगा नदीवाटे या खाडीत वाहून आल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिकांनी वर्तविला आहे.

पाण्यातून हजारो सिलिंडर वाहून जात असल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि ही आगळीवेगळी लूट करण्यासाठी स्थानिक नागरिकांची खाडीकिनारी एकच गर्दी झाली. पेण तालुक्यातील खारपाड्या पासून ते अगदी दादर गावापर्यंतच्या खाडी पात्रात सिलेंडर तरंगताना दिसत होते. हे सिलिंडर धरमतर खाडीच्या दिशेने पुढे सरकत होते. यावेळी गावातील तरुणांनी आणि नागरिकांनी जिवाची पर्वा न करता जमेल तसे हे सिलिंडर पाण्याबाहेर काढण्यास सुरुवात केली.

काही साहसी नागरिकांनी तर चक्क आपल्या छोट्या बोटी आणि होड्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात उतरवल्या. नदीच्या मध्यभागात जाऊन बोटीच्या सहाय्याने सिलिंडर ओढून ते होडीत जमा करण्याचे धाडस अनेक जण करत होते. होडीमध्ये एका वेळी अनेक सिलिंडर भरून ते किनाऱ्यावर आणले जात होते. तर काहीजण पुलावर उभे राहून सिलेंडर काढत होते. सिलिंडर हस्तगत करण्यासाठी लोकांमध्ये मोठी चढाओढ निर्माण झाली होती.

या अजब घटनेची माहिती मिळताच परिसरातील वाहतूकदार आणि नागरिकांनी पुलावर आणि रस्त्यांच्या कडेला मोठी गर्दी केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर पाण्यात कसे आले आणि यामागे नेमका कोणाचा हलगर्जीपणा आहे, याचा शोध आता घेतला जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.