माझी भूमिका : अभिनयाच्या नव्या शक्यतांचा शोध
esakal July 09, 2026 10:45 AM

हुमा कुरेशी, अभिनेत्री

चित्रपटांमध्ये कलाकारांचे कौतुक अनेकदा त्यांच्या संवादफेकीसाठी, प्रभावी उपस्थितीसाठी किंवा भावनिक दृश्यांमधील अभिनयासाठी केले जाते. मात्र काही भूमिका अशा असतात, ज्या कलाकाराला त्याच्या सर्व परिचित साधनांपासून दूर नेतात आणि अभिनयाच्या मूळ क्षमतेची परीक्षा घेतात. मला ‘बेबी डू डाय डू’ या चित्रपटातील ‘बेबी करमरकर’ ही व्यक्तिरेखा अशाच प्रकारची वाटते.

अभिनेत्री म्हणून माझी ओळख अनेक प्रकारच्या भूमिका साकारण्यामुळे निर्माण झाली आहे. कलाकार म्हणून प्रत्येक भूमिका मला काहीतरी नवीन शिकवून जाते; पण ‘बेबी डू डाय डू’मधील ‘बेबी करमरकर’ ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी खूपच खास आहे. कारण या भूमिकेने मला अभिनेत्री म्हणून माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करायला भाग पाडलं. ‘रामन राघव २.०’ या चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दिकीच्या भूमिकेप्रमाणेच माझ्या या चित्रपटातील भूमिकेला अनेक पैलू असल्याने ती मला आव्हानात्मक वाटते.

या चित्रपटात मी एका मूकबधिर कॉन्ट्रॅक्ट किलरची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री म्हणून माझे सर्वांत मोठे बलस्थान नेहमीच भाषा आणि संवाद राहिले आहेत. एखाद्या पात्राच्या भावना, विचार आणि संघर्ष शब्दांतून व्यक्त करण्याची मला सवय आहे. पण ‘बेबी’ साकारताना माझ्याकडून हेच सर्वांत प्रभावी साधन दूर करण्यात आले. सुरुवातीला हे खूप आव्हानात्मक वाटले. कारण संवादांशिवाय पात्र जिवंत कसे करायचे, हा प्रश्न सतत माझ्यासमोर होता.

या भूमिकेसाठी मला शरीरभाषा, चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांमधील भावना आणि सांकेतिक भाषेवर भर द्यावा लागला. प्रत्येक प्रसंगात शब्दांऐवजी शांततेला अर्थ द्यावा लागला. अभिनय करताना मला जाणवले, की माणूस केवळ बोलूनच नव्हे, तर न बोलताही खूप काही व्यक्त करू शकतो. कधी कधी शांतता ही शब्दांपेक्षाही अधिक प्रभावी असते.‘बेबी’ ही केवळ ॲक्शनपटातील व्यक्तिरेखा नाही. तिच्यामध्ये संघर्ष आहे, वेदना आहेत, राग आहे, प्रेम आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वासाठी लढण्याची जिद्द आहे. मला या पात्रामध्ये एक ताकदवान स्त्री दिसली. तिची ओळख तिच्या मर्यादांमुळे नाही, तर तिच्या धैर्यामुळे आणि आत्मविश्वासामुळे निर्माण होते. म्हणूनच ही भूमिका माझ्या मनाच्या खूप जवळ आहे.

या चित्रपटात मी अभिनयाबरोबरच साकीब सलीमसोबत (सलीम सिबलिंग्ज बॅनर) निर्माती म्हणूनही जबाबदारीही सांभाळली आहे. त्यामुळे या कथेशी माझे नाते अधिक घट्ट झाले. निर्माती म्हणून मला वेगळा आशय असलेला चित्रपट प्रेक्षकांसमोर आणायचा होता, तर अभिनेत्री म्हणून ‘बेबी’ला पूर्ण प्रामाणिकपणे जगायचे होते. या दोन जबाबदाऱ्यांनी मला सतत सजग ठेवले.

माझ्यासाठी ‘बेबी डू डाय डू’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर अभिनयाच्या नव्या शक्यता शोधण्याचा प्रवास आहे. या भूमिकेमुळे मला पुन्हा एकदा जाणवले, की कलाकार म्हणून आपण सतत शिकत राहिले पाहिजे. स्वतःला आव्हान देणाऱ्या भूमिका स्वीकारल्या तरच आपण पुढे जाऊ शकतो. मला आशा आहे की, ‘बेबी’ची कथा प्रेक्षकांचे केवळ मनोरंजन करणार नाही, तर त्यांना विचार करायलाही भाग पाडेल. कारण ही कथा आपल्याला सांगते, की ताकद नेहमी आवाजातच असते असे नाही; कधी कधी ती शांततेतही दडलेली असते. ‘बेबी डू डाय डू’मधील ‘बेबी’ ही व्यक्तिरेखा आपल्याला सांगते की अभिनय हा केवळ बोलण्यात नसतो; तो जाणवण्यात असतो. आणि जेव्हा एखादा कलाकार शांततेलाही अर्थ देऊ शकतो, तेव्हा त्याचा अभिनय खऱ्या अर्थाने प्रभावी ठरतो.

(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.