मीनल आडे- भालेराव
अनेक भारतीय घरांमध्ये महिला अत्यंत शिस्तीने महिन्याचे बजेट सांभाळतात, प्रत्येक खर्चाचा चोख हिशेब ठेवतात, सणावारांचे आणि घरगुती कार्यक्रमांचे अचूक नियोजन करतात, मुलांच्या शालेय शिक्षणाचा खर्च योग्य प्रकारे सांभाळतात, कुटुंबाला अनावश्यक खर्चापासून वाचवतात; पण गुंतवणूक, निवृत्तीचे नियोजन, विमा, मालमत्तेचे नियोजन आणि दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीचा विषय येतो, तेव्हा निर्णय घेण्याची धुरा सहसा पुरुषांकडे जाते.
हा क्षमतेचा फरक नाही, तर हा केवळ सहभागाचा फरक आहे. एका नुकत्याच झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, गुंतवणूक आणि निवृत्तीच्या मोठ्या निर्णयांमध्ये पुरुष आघाडीवर असण्याची शक्यता जास्त असते, तर महिला केवळ दैनंदिन पैशांच्या व्यवस्थापनात अधिक गुंतलेल्या असतात. अनेक भारतीय महिला उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापक आहेत; पण संपत्तीनिर्मितीच्या मुख्य चर्चेत त्या नेहमीच भागीदार नसतात.
हे चित्र बदलणे गरजेचे आहे. प्रत्येक महिलेला या गोष्टींची माहिती असायलाच पाहिजे:
कुटुंब नेमकी कुठे आणि कशी गुंतवणूक करत आहे?
कुटुंबाकडे किती रकमेचे विमा कवच उपलब्ध आहे?
कुटुंबावर सध्या कोणती कर्जे आहेत?
भविष्यासाठी किंवा निवृत्तीसाठी किती निधी तयार केला जात आहे?
सर्व महत्त्वाची आर्थिक कागदपत्रे आणि डिजिटल पासवर्ड्स कुठे ठेवले आहेत?
सर्व बँक खाती आणि गुंतवणुकीमध्ये ‘नॉमिनी’ म्हणून नाव नोंदवले आहे का?
दुर्दैवाने कमावती मुख्य व्यक्ती सोबत नसेल, तर आर्थिक घडी कशी बसेल?
कपाटात पैसे साठवणे, सोने खरेदी किंवा बँक एफडी यांसारख्या पारंपारिक बचतींपलीकडे जाऊन महिलांनी आधुनिक आर्थिक साधनांची ओळख करून घेतली पाहजे. डायनिंग टेबलवर पैशांच्या नियोजनाबद्दल उघडपणे बोलण्याची संस्कृती घरात सुरू व्हायला हवी.
आर्थिक संवादात सहभाग : आर्थिक सल्लागारासोबत होणाऱ्या नियोजनविषयक बैठकींना पुरुषांसोबत महिलांनीही उपस्थित राहावे.
लहान पावले, मोठा आत्मविश्वास : स्वतःचे बँक खाते आणि नेट बँकिंग स्वतंत्रपणे हाताळण्यास सुरुवात करा. घरखर्चातून वाचलेल्या पैशांमधून स्वतःच्या नावाने एखादी लहान ‘म्युच्युअल फंड एसआयपी’ सुरू करा.
इमर्जन्सी फंड : संकटकाळात कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये म्हणून घरात एक सुरक्षित ‘आपत्कालीन निधी’ तयार ठेवण्यास पुढाकार घ्या.