इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यामध्येच इस्त्रायलकडून मोठा दावा करण्यात आला. इस्त्रायलच्या दाव्यानुसार, इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याचा कट रचला जात आहे. यावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितले की, माझी हत्या करण्यात त्यांना यश मिळाले तर त्यापूर्वीच मी सैन्याला कारवाईचे आदेश दिले. इराणवर इतिहासातील सर्वात मोठा हल्ला केला जाईल. न्यूयॉर्क पोस्टच्या मुलाखतीमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून इराणच्या यादीत आहे. मी देखील आदेश दिले आहेत. जर माझ्यासोबत काहीही झाले तर इराणवर असा बॉम्ब हल्ला करा की, यापूर्वी त्यांनी कधीही बघितला नसावा.
इस्त्रायलच्या गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती अमेरिकेला दिली. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, नाही नाही.. इस्त्रायलजवळ अशी कोणतीही नवी माहिती नाहीये. मी गेल्या कित्येक वर्षांपासून इराणच्या हीट लिस्टवर आहे. इराणच्या हीट लिस्टमध्ये मी टॉप 1 नंबरवर आहे.
यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मजाक करत म्हटले की, मला आशा आहे की, मी जर जिवंत राहिलो नाही तर तुम्ही सर्व लोक मला कायम आठवणीत ठेवाल. इस्त्रायलने अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या कटाची माहिती दिली. मात्र, त्यात नवीन काही अपडेट नाही. इस्त्रायलकडे असलेली माहिती जुनीच असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने स्पष्ट केले.
इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध थांबले होते. पण पुन्हा एकदा तणाव हा वाढताना दिसला. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर घातक हल्ला करण्याच्या सूचना दिल्या होत्या. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम चर्चा थांबली आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेतही तणाव वाढला आहे. अमेरिकेने इराणसोबतचे युद्ध थांबवले आणि चर्चेला सुरूवात केली हीच गोष्ट इस्त्रायलला खटकली होती. त्यावरून दोन्ही देशात मोठे मतभेद बघायला मिळाले. इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी थेट अमेरिकेला उत्तर दिले.