Political news Maharashtra : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील राजकारणात जाण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे राजकीय वक्तव्य करत, फडणवीस केंद्रात गेल्यास मुख्यमंत्रीपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच नावाचा विचार होईल, असा दावा केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस जर केंद्राच्या राजकारणात गेले, तर मुख्यमंत्रीपदासाठी शंभर टक्के चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा विचार केला जाईल. इतकेच नव्हे, तर स्वतः फडणवीस हेच बावनकुळे यांच्या नावाची शिफारस करतील. हे माझे स्पष्ट राजकीय आकलन आहे."
राज्याचे हित जपणाऱ्या, योग्य दिशेने राज्याला नेणाऱ्या आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवणाऱ्या व्यक्तींना नेहमी शुभेच्छा दिल्या पाहिजेत, असेही राऊत यांनी यावेळी नमूद केले.
मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य शर्यतीत भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या नावाचाही उल्लेख होत असताना, राऊत यांनी त्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. "गिरीश महाजन यांचा ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत खराब आहे," असे म्हणत त्यांनी महाजन यांच्या नावाची शक्यता फेटाळून लावली.
यावेळी संजय राऊत यांनी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या निधीच्या वापराबाबतही आरोप केले. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात आदेश बांदेकर अध्यक्ष असताना मंदिराच्या निधीचा सामाजिक कार्यासाठी चांगला वापर झाला. मात्र, सत्ता बदलल्यानंतर एका कार्यकर्त्याच्या डायलिसिस केंद्रासाठी मंजूर होणारा निधी नव्या अध्यक्षांनी रद्द केला. तसेच "आमच्या पक्षात प्रवेश केलास तरच निधी मंजूर केला जाईल," अशी अट घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
Sanjay Raut letter to Chief Minister : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शालेय साहित्य खरेदीत ५५ कोटींचा घोटाळा?; संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्रदरम्यान, अयोध्या राम मंदिर लूट प्रकरणाचा उल्लेख करत राऊत यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप अटकेत नसल्यामुळे देशभरात असंतोष असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'रामरक्षा आंदोलनाचा' दुसरा टप्पा १८ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजता नागपूर येथे होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि विदर्भातील मोठ्या संख्येने रामभक्त सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.