Sangola FDA Raid: सांगोल्यात एफडीएची मोठी कारवाई! ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त; १५ लाखांचा साठा जागेवरच नष्ट
esakal July 12, 2026 01:45 AM

- दत्तात्रय खंडागळे

सांगोला : सांगोला तालुक्यातील जवळा येथील बुरुंगेवाडी परिसरातील अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शनिवारी (ता. ११) रोजी अचानक धाड टाकून १५ लाख १ हजार २८० रुपये किमतीचा ३७ हजार ५३२ लिटर दुधाचा साठा जप्त करून जागेवरच नष्ट केला. तपासणीदरम्यान परवान्याशिवाय दूध संकलन व चिलिंग युनिट सुरू असल्याचे तसेच दूध भेसळीसह विविध गंभीर अनियमितता आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.

Milk Rate: दूध उत्पादकांना दिलासा! गायीच्या दुधाचा दर ४१ रुपयांवर; तुकाराम मुंढे इफेक्ट, राज्यातील संकलनात २० लाख लिटरची घट

अन्न व औषध प्रशासना सोलापूर कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम व सहायक अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी संबंधित ठिकाणी अचानक तपासणी केली. तपासणीवेळी दुधाचे चार नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. जागेवर करण्यात आलेल्या स्पॉट टेस्टमध्ये दुधात पाणी मिसळल्याचे तसेच एसएनएफ चे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा कमी असल्याचे आढळले.

याशिवाय दूध संकलन व चिलिंग युनिटचा वैध अन्न परवाना नसणे, दूध खरेदी-विक्री व माल पाठविण्याबाबत कोणतीही पद्धतशीर नोंद उपलब्ध नसणे तसेच अनुसूची-४ मधील स्वच्छता व सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ३७ हजार ५३२ लिटर दूध जप्त करण्यात आले. दूध हा नाशवंत पदार्थ असल्याने तो नियमानुसार जागेवरच नष्ट करण्यात आला.

तपासणीवेळी आढळलेल्या सर्व त्रुटी दूर करून वैध अन्न परवाना प्राप्त होईपर्यंत संबंधित आस्थापनेचा व्यवसाय तात्काळ बंद ठेवण्याचे निर्देशही अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे व पुणे विभागाचे सहआयुक्त दि. वा. भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी गणेश म. कदम आणि सहायक अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या पथकाने केली.

Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप.. भेसळीची माहिती त्वरित द्या – सा. ए. देसाई

जिल्ह्यात यापुढेही अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना कुठेही अन्न भेसळीची माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधावा. सर्व अन्न व्यावसायिकांनी वैध अन्न परवाना घेणे, नियमांचे पालन करणे आणि उत्पादन, साठवणूक व परिसराची स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई यांनी केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.