शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपातील नाते सध्या तळ्यात मळ्यात सुरु आहे. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपाचे मंत्री गिरीश महाजन रोज तोंडसुख घेत असतात आणि खडसे देखील त्यांच्यावर प्रचंड टीका करतात. मात्र, गेले काही दिवस भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे म्हटले जात होते. आता तर एकनाथ खडसे यांनी या प्रकरणात आपली भूमिका प्रसारमाध्यमात मांडली आहे.
एकनाथ खडसे यांच्यामागे जमीन खरेदी प्रकरणात खटला गुदरल्यानंतर त्यांनी भाजपाला सोडचिट्टी देऊन शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. मात्र, त्यांची सून रक्षा खडसे भाजपात आहे. तर त्याची मुलगी रोहिणी खडसे राष्ट्रवादीत महिला प्रदेशाध्यक्ष आहे. सून रक्षा खडसे यांनी भाजपाने तिकीट दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपावर टीका करणे कमी केले होते. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावरील टीका थांबवली नव्हती. मात्र, आता बदलेल्या राजकीय परीघात एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपात यावे यासाठी पक्षश्रेष्टी स्वत:च पायघड्या घालत आहेत असे चित्र आहे. या संदर्भात एकनाथ खडसे यांनी आपले मन मोकळे केले आहे.
हे मी आधीच स्पष्ट करू इच्छितो की मला भाजपात प्रवेश करण्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही, मी शरद पवारांसोबत आहे आणि शेवटपर्यंत राहील. माझे कार्यकर्ते हे भाजपमध्ये जातील मी जाणार नाही, माझे कार्यकर्ते इच्छुक आहेत असेही एकनाथ खडसे यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर आधीच सांगितले आहे.
गिरीश महाजन म्हणाले आहेत की मी फार लहान माणूस आहे, यावर एकनाथ खडसे यांना विचारले असता ते म्हणाले की होय गिरीश महाजन खूप लहान माणूस आहे. गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतला माणूस आहे. मी एवढ्या लहान माणसासोबत संघर्ष करतोय. गिरीश महाजन मंत्री होईपर्यंत, त्यांना सर्वच परीने मदत केली,गिरीश महाजन यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे, तो नसता तर त्यांना कोणी ओळखत नाही अशा शब्दात खडसे यांनी आपला राग व्यक्त केला आहे.
अमित शाह यांना तुम्ही भेटला होता काय असे विचारता खडेस म्हणाले की होय मी दिल्लीला गेलो होतो, अमित शाहा यांनी मला फोन करू बोलावलं होतं. अमित शाहांनी मला सांगितलं या भाजप जॉईन करो असे एकनाथ खडसे यांनी यावेळी गौप्यस्फोट करताना सांगितले.
गिरीश महाजन म्हणतात की माझा विरोध त्यांच्या पक्षप्रवेशाला नाही.मात्र वरच्या लोकांनी मला सांगितलं की, ‘आपको प्रवेश दिया तो, लोकल लोक काम नही करेंगे.. असं मला सांगण्यात आल्याचे एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.
‘खडसे को लिया तो सीट गिरा देंगे, ऐसा ब्लॅकमेल किया जा रहा है, इस वजह से आप लोकसभा मे हमारा काम करो.. आगे देखेंगे’ असा सल्ला आपल्याला दिल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगत, मग माझ्या पक्षप्रवेशाला विरोध करतोय कोण? असा सवाल करीत गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता आरोप केला आहे.
खडसे यांनी २०२० मध्ये भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, गेल्या काही काळात त्यांच्या पुन्हा भाजपा प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत.साल २०१६ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठी अमित शाह यांच्याकडे आपली बाजू मांडली होती. अखेर, २०२० मध्ये त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.