भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या टी20 सामन्यात इंग्लंडने भारताला पुन्हा एकदा धोबीपछाड दिला. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय देखील फसला. या मालिकेतील पाचही सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली पण प्रत्येक वेळी पदरी पराभव पडला. पाचव्या टी20 इंग्लंडने भारताच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. इंग्लंडने 20 षटकात 3 गडी गमवून 257 धावा केल्या. तसेच 258 धावांचं लक्ष्य ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना आक्रमक खेळ करावा लागणार हे नक्की होतं. त्यामुळे आघाडीच्या फलंदाजांच्या कामगिरीवर लक्ष होतं. पण पुन्हा एकदा पदरी निराशा पडली. भारताने या सामन्यात 201 धावांपर्यंत मजल मारली आणि हा 56 धावांनी गमावला. यासह पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 0-4 असा पराभव सहन करावा लागला आहे. यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळलेल्या 7 पैकी 6 सामन्यात पराभव झाला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला.
इंग्लंडने भारतासमोवर विजयासाठी 258 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी मैदानात उतरली होती. पण अभिषेक शर्मा अवघ्या 3 धावांवर बाद झाला. त्यामुळे संघावर वेगाने धावा करण्याचं दडपण आणखी वाढलं. तीन सामन्यांच्या ब्रेकनंतर प्लेइंग 11 मध्ये आलेल्या संजू सॅमसनने 14 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकार मारत 27 धावा कले्या आणि बाद झाला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरही काही खास करू शकला नाही. त्याचा खेळही 28 धावांवर आटोपला. तर इशान किशनने एका बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण 35 चेंडूत 56 धावा करून तंबूत परतला. एकीकडे विकेट पडत असताना दुसरीकडे धावा आणि चेंडूचं अंतर वाढत होतं. त्यामुळे पराभव निश्चित होत गेला.
शिवम दुबे 10 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 14 धावा करून बाद झाला. तिलक वर्माने मधल्या फळीत अर्धशतकी खेळी केली. त्याने 24 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार मारत 53 धावा केल्या. पण या अर्धशतकाचा काही एक उपयोग झाला नाही. कारण धावांचं अंतर पाहता हा पराभव आधीच ठरला होता. अर्धशतक ठोकल्यानंतर पुढच्या चेंडूवर जोश टंगने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. सूर्यांश शेडगेही फक्त 7 धावा करून बाद झाला. अक्षर पटेलही 3 धावा करू शकला आणि तंबूत परतला.