साहेब, खरंच सांगतो, तुम्ही 100 टक्के पुन्हा निवडून येणार नाहीत, फुटीर खासदार आष्टीकरांना तरुणाचा थेट फोन; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
Tv9 Marathi July 13, 2026 08:45 PM

काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही समावेश होता. अशातच आता एका शिवसैनिकाने नागेश पाटील आष्टीकर यांना फोन लावून पक्षांतर का केलं म्हणून जाब विचारल्याचे समोर आले आहे. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र टीव्ही 9 मराठी या क्लिपची पुष्टी करत नाही.

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे?

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये शिवसैनिक तरूण म्हणत आहे की, साहेब तुम्ही उद्धव साहेबांच्या सैनेतून तिकडं का गेले? तुमच्यासाठी आम्ही गावोगाव हिंडलो, मशालीसाठी आम्ही परेशान झालोत, साहेब तुम्ही हे बरोबर नाही केलं. तुम्ही पुन्हा निवडून येत नाहीत साहेब, शंभर टक्के सांगायलो, पुन्हा तुम्ही निवडून येत नाहीत. या क्ल्पिमधील आवाज हा नांदेडच्या हदगाव तालुक्यातील ईरापूर येथील शिवसैनिक नंदकिशोर देशमुख यांचा असल्याचे समोर आले आहे.

शिवसैनिक नंदकुमार देशमुख यांनी व्हायरल क्लिपवर बोलताना सांगितले की, ‘नागेश आष्टीकर पाटील हे मशाल चिन्हावर निवडून आले. ते आता चाटायला चालले हे त्यांना शोभत का? तुम्ही पाटील आहात, पाटलांना हे शोभत का? त्यांची गद्दारी ही हिंगोलीसाठी कलंक आहे. साहेबांनी त्याला भरोसा ठेऊन उमेदवारी दिली होती. मी त्यांना तेच विचारत होतो. त्यांनी सांगितलं येऊन भेट. अजून ही त्यांची दादागिरी आहे.’

पाटील नावाला कलंक लागला…

पुढे बोलताना देशमुख यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूट दिली, म्हणून ते अस बोलत आहेत. मला एकच चीड आहे, त्यांना मी मतदान केलं. खिशातील पैसे खर्च केले, त्यांनी खासदार व्हाव म्हणून आम्ही प्रयत्न केले. ह्यांना केवळ पैसे हवेत त्यांना 50 कोटी हवेत. संजय राऊत हे योग्य आहेत. यांना लाखा घाला हे त्यांचं म्हणणं योग्य आहे. तिकडे जायचं असल्यास राजीनामा द्यावा, मग तिकडे जा. पाटील नावाला कलंक लागला आहे. निधी मिळत नाही म्हणून गद्दारी केली अस त्यांचं म्हणणं आहे. त्यांना जाऊन भेटणार, माझी मार खायची तयारी आहे, मी बाळासाहेब यांचा शिवसैनिक आहे.’

देशमुख यांना खासदार अरविंद सावंत यांचा फोन

नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करणाऱ्या नंदकिशोर देशमुख यांना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी फोन केला आहे. यावेळी सावंत यांनी देशमुख यांना धीर दिला. आता आज सायंकाळपर्यंत उद्धव ठाकरे हे शिवसैनिक नंदकुमार देशमुख यांच्यासोबत संवाद साधणार असल्याची माहिती समोर आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.