अस्थिबोध : स्पाइन सर्जरीची भूमिका
esakal July 14, 2026 10:45 AM

डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन

अनेक रुग्णांना वाटतं, की एमआरआयमध्ये स्लिप डिस्क दिसली म्हणजे ऑपरेशन अटळ आहे, तर काहीजण कोणत्याही परिस्थितीत स्पाइन सर्जरी टाळलीच पाहिजे, असं मानतात. मात्र, खरं वास्तव या दोन्ही टोकांच्या मध्ये आहे. आधुनिक स्पाइन सर्जरी प्रत्येक रुग्णासाठी आवश्यक नसते; मात्र योग्य रुग्णांमध्ये ती वेदना कमी करण्यास, हालचाल सुधारण्यास आणि जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या वाढवण्यास मदत करू शकते.

स्पाइन सर्जरी म्हणजे नेमकं काय?

  •   नसांवरील दाब कमी करणे

  •   कण्याला स्थिरता देणे

  •   विकृती (deformity) दुरुस्त करणे

  •   जीवनाची गुणवत्ता सुधारणे

स्पाइन सर्जरीचं उद्दिष्ट फक्त एमआरआय सुधारण्याचं नसतं; रुग्णाला पुन्हा वेदनामुक्त हालचाल मिळवून देणं हे त्यामागचं मुख्य ध्येय असतं.

सर्व पाठदुखीसाठी ऑपरेशन करावं लागतं का?

नाही. खालील परिस्थितींमध्ये बहुतेक रुग्ण ऑपरेशनशिवाय बरे होऊ शकतात:

  •   साधी कंबरदुखी

  •   सुरुवातीचा स्लिप डिस्क त्रास

  •   मानेची सौम्य वेदना

  •   स्नायूंचा ताण

  •   सुरुवातीची स्पॉन्डायलोसिस

योग्य औषधं, फिजिओथेरपी, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल यामुळे अनेक रुग्णांमध्ये चांगली सुधारणा होते.

ऑपरेशनचा विचार कधी करावा?

१) तीव्र पायात किंवा हातात जाणारी वेदना

  •   अनेक आठवडे टिकणारी वेदना

  •   औषधांनी आराम न मिळणं

  •   दैनंदिन कामांवर परिणाम

२) नसांची कमजोरी

  •   पाय ओढला जाणं

  •   जिना चढताना त्रास

  •   हातातील वस्तू पडणं

३) चालण्याची क्षमता कमी होणं

  •   थोडं चालल्यावर पाय जड होणं

  •   बसल्यावर आराम मिळणं

  •   पुन्हा चालल्यावर वेदना सुरू होणं

ही लक्षणं नसांवर गंभीर दाब असल्याचं सूचित करू शकतात.

तातडीची लक्षणे

खालील लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये :

  •   लघवीवरील नियंत्रण कमी होणं

  •   शौचावर नियंत्रण कमी होणं

  •   गुप्तांगाभोवती बधिरपणा

  •   अचानक वाढलेली कमजोरी

या परिस्थितीत तातडीने स्पाइन सर्जनचा सल्ला घेणं आवश्यक असतं.

एमआरआय रिपोर्ट आणि ऑपरेशनचा निर्णय

अनेक रुग्ण विचारतात : ‘एमआरआयमध्ये मोठी स्लिप डिस्क दिसत आहे, म्हणजे ऑपरेशन करावंच लागेल का?’ याचं उत्तर - नाही. ऑपरेशनचा निर्णय फक्त एमआरआयवर घेतला जात नाही. डॉक्टर खालील गोष्टींचा एकत्रित विचार करतात :

  •   रुग्णाची लक्षणं

  •   तपासणीतील निष्कर्ष

  •   एमआरआयमधील बदल

  •   उपचारांचा प्रतिसाद

  •   दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम

म्हणून एकसारखा एमआरआय असलेल्या दोन रुग्णांचे उपचार पूर्णपणे वेगळे असू शकतात.

आधुनिक सर्जरीमुळे बदल

आजच्या तंत्रज्ञानामुळे :

  •   अधिक अचूक शस्त्रक्रिया शक्य आहेत

  •   जखम लहान असू शकते

  •   रक्तस्राव कमी होतो

  •   हॉस्पिटलमध्ये कमी दिवस राहावं लागतं

  •   पुनर्वसन जलद होतं

यामुळे योग्य रुग्णांमध्ये परिणाम अधिक चांगले मिळतात.

डॉक्टरांना कधी भेटावे?

  •   सहा-आठ आठवड्यांनंतरही वेदना कायम राहणं

  •   पायात किंवा हातात जाणारी वेदना

  •   वाढती कमजोरी

  •   चालण्याची क्षमता कमी होणं

  •   लघवी किंवा शौचावरील नियंत्रणात बदल

स्पाइन सर्जरी ही प्रत्येक पाठदुखीवरचा उपाय नाही; पण आवश्यक असताना ती अत्यंत प्रभावी उपचार ठरू शकते. लक्षात ठेवा, योग्य रुग्ण, योग्य वेळ आणि योग्य शस्त्रक्रिया यांचं संयोजन मिळालं, तर स्पाइन सर्जरी वेदना कमी करण्यापेक्षा जास्त काही करते; ती माणसाला पुन्हा सक्रिय आणि आत्मविश्वासपूर्ण आयुष्य जगण्याची संधी देते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.