देवयानी एम., लाइफस्टाइल कोच
स्ट्रेस (ताण) म्हटलं की बहुतेकांना वाटतं खूप काम, आर्थिक अडचणी, नात्यांमधले वाद, दुर्धर आजार किंवा एखादी मोठी समस्या उद्भवणं. काहीतरी ‘मोठं’ घडलं की स्ट्रेस येतो असा आपला समज असतो; पण शरीर आणि मेंदूची भाषा वेगळी असते. ‘ज्या कोणत्याही गोष्टीमुळे शरीराला किंवा मनाला सतत परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं, तो ताण.’
आपला मेंदू शरीरामध्ये, तसंच बाह्य वातावरणात होणारे सूक्ष्म बदलही सतत ओळखत असतो आणि त्यांचं मूल्यमापन करत असतो. या बदलांच्या आधारे तो परिस्थिती सुरक्षित आहे की धोकादायक, याचा अंदाज घेऊन शरीराची योग्य प्रतिक्रिया निर्माण करतो. आयुष्यात काहीच विशेष बिघडलं नसतानाही माणूस थकलेला, चिडचिडा किंवा एकलकोंडा वाटू शकतो. कारण ताण नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. अनेकदा तो शांतपणे साचत राहतो.
दिसणारे आणि न दिसणारे ताण
काही ताण सहज दिसतात. परीक्षा, नोकरीतील दबाव, व्यवसायातील अनिश्चितता, आर्थिक चिंता, आजार, नात्यातील तणाव, मुलांची जबाबदारी, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, स्थलांतर इत्यादी. पण एक वेगळी यादी आहे, जी आपण अनेकदा ताण म्हणून मोजतच नाही. रोजची अपुरी झोप, सतत फोनचे नोटिफिकेशन्स, प्रत्येक रिकाम्या क्षणी स्क्रीनकडे पाहण्याची सवय, सतत इतरांशी तुलना, अहंकार, कामातून न मिळणारा विराम, नेहमी उपलब्ध राहण्याची अपेक्षा, भावना दाबून ठेवणं आणि कुठंही मन मोकळं न करणं, ‘मी ठीक आहे’ असं वारंवार म्हणत स्वतःचा आतला आवाज न ऐकणं. अनेकदा सकारात्मक घटनासुद्धा ताण निर्माण करू शकतात. जसं लग्न, नवीन नोकरी, बाळाचा जन्म, परदेशात जाणं.. कारण प्रत्येक बदलासाठी शरीर आणि मनाला पुन्हा जुळवून घ्यावं लागतं.
ताण शरीरात काय करतो?
ताण सुरू होतो मनाच्या पातळीवर आणि साचू लागतो शरीरातील विविध भागांमध्ये, जो काही काळानंतर आरोग्याच्या विकारांमध्ये रूपांतरित होतो. जंगलात अचानक एखादा हिंस्र प्राणी समोर आला, तर विचार करायला वेळ नसतो. शरीर एका क्षणात सज्ज होतं. हृदय वेगानं धडधडतं, रक्तदाब वाढतो, श्वास जलद होतो, रक्त स्नायूंमध्ये जास्त जातं, पचन थोड्या वेळासाठी मंदावतं, मेंदूचं लक्ष फक्त धोक्यावर केंद्रित होतं. ही यंत्रणा अत्यंत आवश्यक आहे कारण जीव वाचवायचा असतो. मात्र, शरीराला रोजच एखादा ‘वाघ’ (म्हणजे धोका) आजूबाजूला असल्यासारखं वाटू लागतं, तेव्हा समस्या सुरू होते. फरक एवढाच, की आज वाघाऐवजी ई-मेल, मीटिंग, ईएमआय, सोशल मीडिया, नात्यातला तणाव किंवा भविष्याची चिंता आहे. धोका काल्पनिक असला, तरी शरीराची प्रतिक्रिया खरी असते. ताण दीर्घकाळ टिकला, तर त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागतात. झोप उथळ होते, रात्री शरीर थकलेलं असतं; पण मेंदू बंद होत नाही. सकाळी उठूनही ताजेपणा वाटत नाही. काही जण जास्त खातात, काहींची भूकच मरते. पचन बिघडतं, रक्तदाब, रक्तातील साखर आणि वजन यांच्यावर परिणाम होऊ लागतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी पडू शकते. शरीरात सूज वाढवणाऱ्या प्रक्रिया सक्रिय राहू शकतात. हृदय, मेंदू, यकृत, आतडी, हार्मोन्स यांचे संपूर्ण शरीरावर त्याचे परिणाम उमटू लागतात. लक्ष केंद्रित करणं कठीण होतं, लहान निर्णय घेणंसुद्धा अवघड वाटू लागतं, स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटते, संयम कमी होतो, चिडचिड वाढते, आणि महत्त्वाचं म्हणजे विचारांची गुणवत्ता ढासळते. नकारात्मकता वाढते. म्हणजेच, ताण जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो.
बहुतेक लोक ताणमुक्त आयुष्य शोधत असतात. मात्र, ते शक्य नाही आणि वास्तववादी ध्येयही नाही. आपण जिवंत आहोत, तोपर्यंत बदल असतील, अनिश्चितता, अपेक्षा, नवीन आव्हानं असतील, म्हणजे ताण हा असणारच आहे.
खरा प्रश्न ताण कसा टाळायचा हा नाही, तर ताण आल्यानंतर आपण किती लवकर पूर्ववत होतो, हा आहे. यालाच मानसिक आणि शारीरिक लवचिकता (resilience) म्हणतात. शरीर आणि मन असं घडवणं, जे ताणाला घाबरत नाही, त्याच्याशी झुंजतही नाही; तर त्याला ओळखतं, स्वीकारतं आणि पुन्हा संतुलनात परत येण्याची क्षमता विकसित करतं. मजबूत मन म्हणजे कधीच ताण न येणं असं नाही. मजबूत शरीर म्हणजे कधीच थकवा न येणं असं नाही. तर ताणानंतर पुन्हा संतुलनात परत येण्याची क्षमता. ही क्षमता छोट्या छोट्या, सातत्यपूर्ण सवयींनी तयार होते.
शरीराला नियमित हालचाल हवी. रोज कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा
श्वास शांत असला, तर मनही शांत होतं. रोज थोडा वेळ प्राणायाम आणि ध्यान व्हावं
पुरेशी आणि दर्जेदार झोप
पौष्टिक आहार मेंदूचाही आहार आहे
अर्थपूर्ण नाती शरीरासाठी औषधासारखी असतात. मनापासून मनमोकळा संवाद हवा
निसर्गातला वेळ मनाला रीसेट करतो.
एकावेळी एका गोष्टीवर लक्ष देणं आरोग्यदायी आहे.
स्क्रीनपासून थोडा विराम. स्वतःबरोबर शांत क्वालिटी मी-टाइम
हे तत्त्वज्ञान नाही. हे शरीराच्या कार्यपद्धतीशी सुसंगत वर्तन आहे. या गोष्टी वरवर साध्या वाटतात; पण शरीराला त्या अत्यंत शक्तिशाली संकेत देतात, ‘धोका संपला आहे. आता दुरुस्ती, पुनर्बांधणी आणि विश्रांती सुरू करूया.’