Omi Vaidya on Sonum Wangchuk: दिल्लीतील जंतर-मंतरवर शिक्षणतज्ज्ञ आणि हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या आमरण उपोषणाला 16 दिवस उलटले आहेत. त्यांच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली जात असताना '3 इडियट्स' चित्रपटात 'चतुर रामलिंगम'ची भूमिका साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता ओमी वैद्यने (Omi Vaidya) सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सोनम वांगचुक यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.मी फुन्सुक वांगडूला मरताना पाहू इच्छित नाही. असं म्हणत त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ केलाय. विशेष म्हणजे '3 इडियट्स'मधील आमिर खानने साकारलेले 'फुन्सुक वांगडू' हे पात्र सोनम वांगचुक यांच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरित होतं.
कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतर येथे हे आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेतील घोटाळ्याविरोधात गेल्या 24 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे., 28 जूनपासून सोनम वांगचुक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तेव्हापासून ते बेमुदत उपोषणावर आहेत.
ओमी वैद्य याने व्हिडीओमध्ये भावनिक आवाहन करत म्हटले, "मी फुन्सुक वांगडूला मरताना पाहू इच्छित नाही. मी '3 इडियट्स'मधला तोच चतुर आहे आणि आज मला एक महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे." त्यांनी सांगितले की, '3 इडियट्स'मधील फुन्सुक वांगडू हे पात्र प्रत्यक्ष आयुष्यातील अभियंता, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्यापासून प्रेरित होतं. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाल्याचेही ओमीने सांगितले.
ओमी वैद्य म्हणाला की, सोनम वांगचुक हे शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्व, लडाखमधील नागरिकांचे हक्क आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. प्रत्येकाची भूमिका वेगळी असू शकते, मात्र समाजासाठी इतके कार्य करणाऱ्या व्यक्तीला अशा अवस्थेत पाहणे वेदनादायी आहे. ज्यांना त्यांच्या मागण्या योग्य वाटतात. त्यांनी सोशल मीडियावर त्यांचा आवाज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा आणि लोकप्रतिनिधींनाही हा मुद्दा मांडावा, असे आवाहनही त्याने केले.
View this post on Instagram
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला 16 हून अधिक दिवस उलटले असून त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. उपोषण सुरू झाल्यापासून त्यांचे वजन सुमारे 8.2 किलोने घटले असून रक्तातील साखरेची पातळीही धोकादायकरीत्या कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत विविध क्षेत्रांतील व्यक्ती त्यांना पाठिंबा देत आहेत.
ओमी वैद्य यांना 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या '3 इडियट्स' चित्रपटातील 'चतुर रामलिंगम' या भूमिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी 'दिल तो बच्चा है जी', 'देसी बॉयज', 'मिरर गेम' यांसारख्या चित्रपटांत काम केले. तसेच 'द ऑफिस' आणि 'अरेस्टेड डेव्हलपमेंट' या आंतरराष्ट्रीय मालिकांमध्येही तो झळकला. अभिनयासोबतच लघुपटांचे दिग्दर्शन आणि चित्रपट संपादनाचे कामही तो करतो.