Mumbai Gazal Festival Khazana: 'खजाना; संगीत, संवेदना आणि समाजसेवेचे २५ वर्षे ; २५, २५ जुलैला मुंबईत रंगणार गझलेचा महोस्तव
esakal July 15, 2026 11:45 PM

मुंबई : पंकज उधास, अनूप जलोटा आणि तलत अझीज या तीन जिवलग मित्रांच्या संकल्पनेतून २००१ मध्ये 'खजाना या गझल महोत्सवाची सुरुवात झाली. या महोत्सवाने अनेक नवोदित गझल गायकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देत त्यांना जगासमोर आणले.अंसख्य गझल गायकांना घडवणाऱ्या या महोत्सवाने पाहता पाहता २५ वर्षांचा टप्पा गाठला आहे.

देश-विदेशातील गझल रसिक ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात, तो 'खजाना – अ फेस्टिव्हल ऑफ गझल्स' यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. २४ आणि २५ जुलै रोजी मुंबईतील नरीमन पॉइंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये हा महोत्सव रंगणार असून यावेळी दिवंगत आशा भोसले तसेच गेल्या २५ वर्षांत 'खजाना'ला समृद्ध करणाऱ्या दिग्गज गायकांना विशेष आदरांजली वाहण्यात येणार आहे.

या निमित्ताने ट्रायडेंट हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला नामवंत गायक तलत अझीज, हरिहरन, विशाल भारद्वाज, रेखा भारद्वाज, सुदीप बॅनर्जी आणि अनूप सोनी उपस्थित होते.यावेळी सर्व नामवंतानी खजानाचा प्रवास उलगडून दाखवला. तसेच खजानाचे आधारस्तंभ राहीलेल्या दिवंगत पंकज उधास यांची आठवण आवर्जुन निघाली. यावेळी बोलताना गायक तलत अझीज यांनी पंकज उधास आणि भूपिंदर हे दोघे आज आपल्यात नसले, तरी त्यांचे प्रेम आणि कला कायम आपल्यासोबत कायम असल्याचे सांगीतले. दिवंगत पंकज उधास यांच्या पत्नी फरिदा उधास म्हणाल्या की "'खजाना' हा पंकज उधास यांच्यासाठी केवळ संगीत महोत्सव नव्हता, तर तो आशेचा संदेश होता. ते आज आपल्यात नसले, तरी त्यांची प्रेरणा प्रत्येक सुरातून आजही जिवंत आहे."

गेल्या दशकभरापासून या महोस्तवाशी जुळलेल्या गायिका रेखा भारद्वाज आणि संगीतकार, दिग्दर्शक विशाल भारद्वाज हे आवर्जुन उपस्थित होते. खजानाच्या निमित्ताने गायनाशिवाय मानवता हा गुण मी पंकज उदास यांच्याकडून शिकल्याचे रेखा भारद्वाज यांनी आवर्जुन सांगीतले. तर पंकज उदास यांनी खजानाच्या माध्यमातून पेरलेले बीज आज वटवृक्ष झाला असून याचे आम्ही एक भाग आहोत याचा अभिमान वाटतो असे विशाल भारद्वाज यांनी म्हटले.

कर्करुग्णांसाठी निधी

या महोत्सवाच्या माध्यमातून कर्करोगग्रस्त आणि थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या उपचारांसाठी निधी उभारला जातो. आतापर्यंत या उपक्रमातून १०.६ लाखांहून अधिक रुग्णांना मदत करण्यात आली आहे. तसेच ४.७ लाख नागरिकांची कर्करोग तपासणी, ५८ हजार मुलींना एचपीव्ही लसीकरण आणि ३५ हजार कुटुंबांना नवजीवन देण्यात आल्याची माहिती 'सीपीएए'चे संस्थापक वाय. के. सप्रू यांनी दिली.

दोन दिवसाचा महोस्तव

या महोत्सवात अनूप जलोटा, हरिहरन, विशाल भारद्वाज, रेखा भारद्वाज, सोनू निगम, जावेद अली, सुदीप बॅनर्जी, मधुबंती बागची, सुनील मुंगी, अलेना भारती आणि तेजस गंभीर हे कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनूप सोनी आणि रक्षंदा खान करणार आहेत. तसेच 'खजाना गझल टॅलेंट हंट २०२६'च्या विजेत्यांचाही गौरव करण्यात येणार आहे.यंदा हा महोस्तव लाईव्ह स्ट्रिम केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष संगीत टिझरही प्रदर्शीत करण्यात आले.

२५ वर्षांचा हा प्रवास अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरला आहे. कर्करोग आणि थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी मोठा निधी उभारला आहे.

अनूप जलोटा, गायक

खजाना हा आमच्यासाठी एक गझल महोस्तव नाही तर तो एक अनुभूती, परंपरा, प्रेम व ठेवा आहे. गझलेचा सुंगध कायम दरवळत राहो.

तलत अझीज , गझल गायक

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.