टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
जयदीप मेढे July 26, 2026 06:43 PM

Zimbabwe vs India, 3rd T20I: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अंतिम सामना आज हरारे येथे खेळला जाईल. सामना सायंकाळी साडे चार वाजता सुरू होईल. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता ते झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्नात असतील. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 16 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 13 सामने भारताने जिंकले आहेत, तर झिम्बाब्वेने केवळ तीन सामने जिंकले आहेत.

टीम इंडियात चार बदल होणार

या सामन्यात प्रिन्स यादवच्या जागी  अशोक शर्माला संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवम दुबेंच्या सूर्यांशे शेडगेला संधी मिळणार का? याची उस्तुकता आहे. अभिषेक शर्माऐवजी प्रभासिमरन सिंगला संधी दिली जाऊ शकते, तर रवी बिश्नोईच्या जागी हर्ष दुबेला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

ईशान आणि टिळक यांनी अर्धशतके झळकावली

सध्याच्या मालिकेत ईशान किशन भारतासाठी सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. त्याने दोन सामन्यांमध्ये 116 धावा केल्या आहेत. दुसऱ्या टी-20 सामन्यात ईशानने 44 चेंडूंमध्ये 81 धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. तिलक वर्मा देखील उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने दोन डावांमध्ये 66 धावा केल्या आहेत आणि दुसऱ्या सामन्यात इशानसोबत चौथ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली, ज्यात त्याने नाबाद 60 धावा केल्या.

गोलंदाजीमध्ये, प्रिन्स यादवने भारतासाठी सर्वाधिक बळी घेतले असून, त्याने दोन सामन्यांमध्ये चार बळी घेतले आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी 10 धावांत 2  बळी ही आहे. दुसऱ्या सामन्यात, त्याने बेन करन आणि कर्णधार सिकंदर रझा यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेऊन झिम्बाब्वेला सुरुवातीलाच विकेट्स मिळवून दिल्या.

मारुमणी आणि मुझारबानी यांच्याकडून अपेक्षा

झिम्बाब्वेच्या फलंदाजीमध्ये, ताडीवानाशे मारुमणीने दोन सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा केल्या असून त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 27 आहे. गोलंदाजीमध्ये, ब्लेसिंग मुझारबानी हा संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने दोन सामन्यांमध्ये  तीन बळी घेतले असून, त्याची सर्वोत्तम कामगिरी 2/26 आहे. कर्णधार सिकंदर रझा आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. पहिल्या सामन्यात तो 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर दुसऱ्या सामन्यात एकही धाव न काढता बाद झाला.

खेळपट्टीचा अहवाल आणि हवामान

हरारे स्पोर्ट्स क्लबची खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना स्विंग आणि सीम देते, परंतु खेळपट्टी जुनी झाल्यावर फलंदाजी सोपी होते. त्यामुळे, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

हरारेमध्ये रविवारी हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता नाही. तापमान 10 ते 26 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

संभाव्य प्लेईंग 11

  • भारत: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, मयंक यादव, आणि यश ठाकूर.
  • झिम्बाब्वे: ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमणी, बेन कुरन, डिओन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेस्ली माधेवेरे, ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, रिचर्ड नगारवा आणि ब्लेसिंग मुझाराबानी.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.