मीराबाई चानूची सोनेरी कामगिरी...राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, चार पदकांसह भारत गुणतालिकेत आठव्या स्थानी
मुकेश चव्हाण July 27, 2026 09:43 AM

Mirabai Chanu Weightlifting Gold Medal: भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu) हिने ग्लासगो येथे सुरू असलेल्या 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2026) महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. मीराबाईने स्नॅचमध्ये 85 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 105 किलो असे एकूण 190 किलो वजन उचलत राष्ट्रकुल स्पर्धेचा नवा विक्रम प्रस्थापित केला. या विजयासह भारताला स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक (Mirabai Chanu Weightlifting Gold Medal) मिळाले. विशेष म्हणजे, मीराबाईचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग तिसरे सुवर्णपदक असून तिच्या नावावर आता एकूण चार राष्ट्रकुल पदके झाली आहेत. मीराबाई चानूने 2018, 2022 आणि आता 2026 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदकावर नाव कोरले. यापूर्वी 2014 च्या स्पर्धेत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.सुवर्ण जिंकल्यानंतर राष्ट्रगीताच्या वेळी मीराबाई भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.

190 किलो वजन उचलत मीराबाई चानूचा विक्रम- (Mirabai Chanu Gold Medal)

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क या दोन्ही प्रकारांमध्ये मिळून एकूण 190 किलो वजन उचलले. तिचा हा विजय अधिक विशेष ठरला, कारण तिने दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नायजेरियाच्या रुथ न्यॉन्ग हिच्यापेक्षा तब्बल 22 किलो अधिक वजन उचलले. स्नॅच फेरीत मीराबाईने 85 किलो वजन उचलत राष्ट्रकुल स्पर्धेचा नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर क्लीन अँड जर्क फेरीत 105 किलो वजन उचलून तिने एकूण 190 किलोची नोंद केली आणि सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. हे राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने जिंकलेले दुसरे पदक ठरले. यापूर्वी पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात ऋषिकांत सिंहने रौप्यपदक पटकावले होते.

पहिल्या प्रयत्नात अपयश- (Commonwealth Games 2026)

क्लीन अँड जर्क फेरीत मीराबाईने पहिल्याच प्रयत्नात 105 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र ती त्यात अपयशी ठरली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने यशस्वीपणे 105 किलो वजन उचलत सुवर्णपदक निश्चित केले. या पदकासह भारताने पदकतालिकेत सातवे स्थान मिळवले आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण तीन पदके जमा झाली आहेत. मीराबाई चानूने सुवर्ण, ऋषिकांत सिंहने रौप्य, तर पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये झंडू कुमारने कांस्यपदक जिंकले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मीराबाई चानूचे ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन- (PM Modi Congratulates Mirabai Chanu Wins Gold Medal)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानू यांचे वर्णन प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान असे केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी म्हटले की, भारतीय वेटलिफ्टिंगमध्ये आणखी एका नवीन अध्यायाची भर पडली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) सलग सुवर्णपदके जिंकून आणि या स्पर्धांमधील आपले एकूण चौथे पदक मिळवून त्यांनी प्रत्येक भारतीयाला प्रेरित केले आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढील आव्हानांसाठी त्यांना शुभेच्छा...असं नरेंद्र मोदींनी सांगितले.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.