Mumbai News: आता मुंबईकरांना नो टेन्शन! १० टक्के पाणीकपातीचं संकट दूर होणार, कधीपासून? तारीख आली समोर
esakal July 27, 2026 10:46 PM

मुंबई : मुंबई शहरासह पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहराला वर्षभर पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. सध्या मुंबईतील सातही जलाशयांमध्ये एकूण १२,७९,५३४ दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. त्यामुळे मुंबईत सुरु असणारी १० टक्वे पाणी कपात कधी संपणार, असा प्रश्न मुंबईकरांकडून विचारला जात असताना यावर बीएमसीने महत्त्वाची माहिती दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, सोमवार (ता. २७) रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत, सर्व सात जलाशयांमध्ये एकूण १२,७९,५३४ दशलक्ष लिटर पाणी साचले आहे. गेल्या २४ तासांत जलाशयातील पाणीसाठ्यात २.२२% वाढ झाली असून ८८.४० टक्के इतके पाणी जमा झाले आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठा सतत वाढत असल्याने मुंबईत लागू करण्यात आलेल्या पाणी कपातीबाबतचा निर्णय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेतला जाणार आहे.

Mumbai News: विठ्ठल-रखुमाई मंदिराला हेरिटेज दर्जा? गिरगावच्या ३०० वर्ष पुरातन वास्तूसाठी सूचना मागवल्या

बीएमसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, मुंबईतील तलावांमधील पाणीसाठा वेगाने वाढला आहे. परंतु प्रशासन पुढील ७ ते ८ दिवस पाण्याची पातळी आणि पावसावर लक्ष ठेऊन पाणी कपातीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. तथापि, येत्या काही दिवसांत जलाशय पूर्णपणे भरल्यास १५ ऑगस्टपूर्वी मुंबईतील पाणी कपात हटवली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सर्व धरणातील पाणीसाठा किती?

बीएमसीच्या माहितीनुसार, विहार, तुळसी आणि मोडकसागर जलाशय पूर्ण भरले आहेत. तानसा तलावात ९८.९३ टक्के, मध्य वैतरणामध्ये ९१.२१ टक्के, भातसामध्ये ८६.८६ टक्के आणि वरच्या वैतरणामध्ये ७५.७६ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला आहे. गेल्या २४ तासांत, मध्य वैतरणामध्ये १.९० मीटरची सर्वाधिक पाणी पातळी वाढ नोंदवली गेली. तर भातसामध्ये ०.५० मीटर, वरच्या वैतरणामध्ये ०.२४ मीटर आणि तानसामध्ये ०.०१ मीटरने पाणी पातळी वाढली आहे.

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! महालक्ष्मी येथे स्वयंचलित पादचारी पूल खुला होणार, २० मिनिटांचं अंतर कमी होणार
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.