Maharashtra News Live Update : ठाकरे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा, बेगानी शादीमें अब्दुला दिवाना : गिरीश महाजन
Sarkarnama July 27, 2026 10:46 PM
ठाकरे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा, बेगानी शादीमें अब्दुला दिवाना : गिरीश महाजन

ठाकरे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा, बेगानी शादीमें अब्दुला दिवाना आहेत. बॅंड वाजला कि हे नाचत जातात. लग्न कोणाचं आहे, हे माहिती नाही. पण चालेले नाचायला, अशी परिस्थिती ठाकरेंची झालेली आहे. त्यांना काहीही देणं घेणं नाही. त्यांच्या काळात टीईटीचा एवढा मोठा घोटाळा झाला आहे. तेव्हा यांनी मोर्चा काढला नाही. आपल्या मागे जनाधार राहिलेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना हाताशी धरून, त्यांच्या भडकविण्याचे काम केले जात आहे, असा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

काही विद्यार्थी, मुस्लिमांना टार्गेट केलं जातंय; कायदेशीर मार्गदर्शनासाठी कपिल सिब्बलांची भेट घेतली : सौरव दास

नीट पेपर फुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही राज्यात कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत ८६ जणांना तब्यात घेण्यात आले आहे. तसेच आंदोलनातील मुस्लिमांना टार्गेट केले जात आहे. कॉक्रोच जनता पार्टी आंदोलक विद्यार्थ्यांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करत आहे. याच मुद्यावर ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांच्याकडे मार्गदर्शनाची मागणी केली होती, त्यानुसार आम्ही त्यांना भेटलोय, असे काक्रोच जनता पार्टीचे सचिव सौरव दास यांनी सांगितले.

आंदोलक विद्यार्थ्यांना एक कोटीची आर्थिक मदत करण्याची कपिल सिब्बल यांची घोषणा

नीट पेपर फुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या विद्यार्थ्यांवर कारवाई होऊ नये, अशी मागणी आहे. पण, विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या टार्गेट केले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी एक कोटी रुपयांची मदत करणार आहे. देशातील वकिलांनीही या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी केले आहे.

दुबईहून मुंबईला येणाऱ्या विमानाचे गुजरातमध्ये इमर्जन्सी लॅडिंग

दुबईहून मुंबईला येत असलेल्या इंडिगो कंपनीच्या विमानाचे गुजरातच्या राजकोटमधील हिरासर या विमानतळावर इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आले आहे. सामान कक्षातून धूर येताना दिसल्यामुळे हे इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आले आहे. विमानातील सर्व १९४ प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबईत पोलिसांची गाडी अडविणाऱ्या रिया अहिरची सायबर पोलिसांकडे तक्रार

नीट पेपर फुटीप्रकरणी आंदोलन करणारी आणि मुंबई पोलिसांची गाडी अडविणाऱ्या रिया अहिर हिने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिचे फोटो मॉर्फ करून बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याची सायबर सेलच्या मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिया अहिर हिने केली आहे.

दिल्लीतील आंदोलनानंतर राज्य लोकसेवा दक्ष : २२ मार्चच्या पेपरफुटीची आयोग पोलिसांत तक्रार करणार

औषध निरीक्षक या पदासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून २२ मार्च रोजी परीक्षा घेण्यात आली आहे. त्याचा निकालही १२ जून रोजी जाहीर झाला आहे. मात्र, औषध निरीक्षकपदाचा पेपर फुटल्याची तक्रार २१ जुलै रोजी आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानंतर आयोगाच्या सूचनेनंतर तक्रारदाराने अधिकचे पुरावेही आयोगाला सादर केले आहेत. त्याची राज्य लोकसेवा आयोगाने गंभीर दखल घेतली असून पुरावे आणि निवेदनांची तपासणी करून पोलिसां तक्रार करण्यात येणार आहे, असे आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी सांगितले.

Nitin Gadkari नितीन गडकरी यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय... E20 इथेनॉल कार्यक्रमातून गडकरी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ झाल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट्स आणि कथित ‘डीपफेक’विरोधात गडकरींनी याचिका दाखल केलीय... सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध कारवाईची मागणी त्यांनी केलीय... आरोप पूर्णपणे खोटे, दिशाभूल करणारे आणि बदनामीकारक असल्याचा गडकरींचा दावा. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचा असून आपल्या मंत्रालयाशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलंय..

Solapur Protest सोलापुरात अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात मोर्चा

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात सोलापुरात मोर्चा काढलाजातोय. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात विराट मोर्चाला सुरुवात झालीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून सुरू झालेल्या या मोर्चात हजारो नागरिक रस्त्यावर उतरलेत.

Sonam Wangchuk : सोनम वांगचूक डिस्चार्ज मिळाल्यानंतर राजघाटावर गांधींच्या स्मृतीस्थळी

सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते राजघाटावर पोहोचले...राजघाटवर गांधींच्या स्मृतीस्थळी त्यांनी अभिवादन केलं...NEET पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर 26 दिवस उपोषण केलं होतं...आता उपोषण सोडल्यानंतर त्यांनी गांधींच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलंय...

Malshej Ghat Traffic Update माळशेज घाटातून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद

माळशेजघाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आलीये. करंजाळे गावाजवळ रस्ता खचल्यामुळे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलय...

Raj Thackeray Greets Raj Thackeray : राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेयत...आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे...उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर पोहोचलेयत...त्यांनी तिथे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यात.

Hasan Mushrif : 'शेतकऱ्यांच्या विरोधात कुटकारस्थान चाललयं' : हसन मुश्रीफ

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करताना हसन मुश्रीफ यांनी, "शेतकऱ्यांच्या विरोधात कुटकारस्थान चाललयं," असा गंभीर आरोप केला आहे. शेतीमालाचे दर, कृषी धोरणे आणि शेतकऱ्यांसमोरील वाढत्या अडचणींवर त्यांनी सरकारचे लक्ष वेधत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.

लोकसभा, राज्यसभेतील कामकाज संध्याकाळपर्यंत तहकूब

संसदेच्या मान्सून अधिवेशनात विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी घातलेल्या जोरदार गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाले. राज्यसभेचे कामकाज दुपारी ३:०० वाजेपर्यंत, तर लोकसभेचे कामकाज सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

पोलिसावर हल्ला, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका मद्यधुंद तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला.

पेपर फुटीची तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यावर दबाव सुषमा अंधारे यांचा दावा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेप्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत दोन उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यावर दबाव आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी त्याचे बोलणे झाले होते.मात्र, आता त्याचा फोन बंद आहे. त्याच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

लाठीचार्जच्या घटनेवरून संसदेत विरोधकांचा गदारोळ

लाठीचार्जच्या घटनेवरून लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतली. सरकारकडून या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्याची मागणी करत दोन्ही सभागृहांत घोषणाबाजी करण्यात आली. गोंधळामुळे संसदेचे कामकाज काही काळासाठी वारंवार स्थगित करावे लागले. सरकार आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावर तीव्र शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली.

Rahul Gandhi :  बिहारमधील विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गोळीबार झाल्याचा आणि मोठ्या प्रमाणावर अटक व गुन्हे दाखल झाल्याचा दावा करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.

संसदेत विरोधकांचा गदारोळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 12 पर्यंत तहकूब

पावसाळी अधिवेशनादरम्यान विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेत जोरदार घोषणाबाजी केली. गोंधळाचे वातावरण कायम राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेतील नियमित कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. परिस्थिती लक्षात घेऊन दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

नाशिकच्या नांदूर-मध्यमेश्वर धरणातून विसर्ग, मुसळधार पावसामुळे अनेक धरणं भरली

नाशिकच्या पूर्व भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धरणे भरून वाहतायत... यामुळे नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात आलाय... सध्या 46 हजार 227 क्युसेक वेगाने पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने सोडले जातंय... धरणात पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने विसर्ग टप्प्याटप्प्याने आणखी वाढवला जाईल, असे प्रशासनाने जाहीर केलंय...

विद्यार्थ्यांवर लाठीमाराचे आदेश कोणी दिले? राऊतांचा सरकारला थेट सवाल

विद्यार्थ्यांवरील लाठीमार प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेची जबाबदारी निश्चित करून विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश नेमके कोणी दिले, असा थेट प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

NEETनंतर MPSC परीक्षेवरही पेपरफुटीचे आरोप; आयोगाने दिले स्पष्टीकरण

MPSCच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेत पेपरफुटी झाल्याचा आरोप समोर आला आहे. परीक्षेपूर्वी व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचा तसेच गुणांमध्ये विसंगती असल्याचा दावा करत दोन उमेदवारांनी तक्रार केली आहे. मात्र, आयोगाने हे आरोप फेटाळून लावत प्रकरणाची पडताळणी सुरू असून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

MPSC भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत २ उमेदवारांची FDA कडे तक्रार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत २ उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

अजित पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने बाळासाहेब पिंगळे अडचणीत

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मखमलाबाद विद्यालयात दिवगंत अजित पवार जयंतीचा कार्यक्रम वादात सापडला आहे. सत्ताधारी गटाचे बाळासाहेब पिंगळे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या विषयी आपत्तीजनक विधान केले. हा वाद आता चांगलाच चिघळला आहे. मविप्र संस्थेच्या मखमलाबाद विद्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार जयंती कार्यक्रम झाला. यावेळी बाळासाहेब पिंगळे यांनी अजित पवार यांच्या विषयी अवमानजनक विधाने केले. त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर बाळासाहेब पिंगळे यांच्यावर चांगलीच टीका झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पिंगळे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. पिंगळे यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरतीचे आयोजन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर शिवसेनेच्या वतीने काल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. सरकारच्या विरोधातील लोकशाही लढ्यासाठी उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि संघर्षासाठी अखंड बळ लाभावे, अशी प्रार्थना यावेळी गणरायाच्या चरणी करण्यात आली. यावेळी शिवसेना उबाठा चे कार्यकर्ते आरतीसाठी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुद्धा केली...

महिला सुरक्षेसाठी १० कलमी कृती आराखडा लागू होणार

महिला सुरक्षेसाठी १० कलमी कृती आराखडा लागू होणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या ‘कॅटॅलिस्ट्स फॉर चेंज’ कार्यक्रमात माहिती देण्यात आली आहे. महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि समानता अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावर १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा लागू करण्यात येणार आहे. २४ ते २६ या तारखेदरम्यान या प्रशिक्षण शिबिरात देशातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील वरिष्ट प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी महिलांच्या प्रश्नांकडे संवेदनशील, उत्तरदायी आणि सक्रिय दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.

ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबण्याची शक्यता

राज्यात एसआयआर मोहीम सुरू असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी ४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यास स्थगिती दिली आहे. एसआयआर मोहिमेनंतर प्रसिद्ध होणारी विधानसभा मतदारसंघनिहाय यादी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगास विनंती केली आहे. जिल्ह्यातील सुमारे ७५४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी वापरण्यात येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे मतदार यादीतील मयत, दुबार, स्थलांतरीत, तसेच बोगस मतदारांची नावे वगळून अद्ययावत होणारी मतदार यादीचा वापर होणार आहे.

केंद्र सरकार आज संसदेत सुधारित 'अँटी-पेपर लीक' विधेयक मांडणार

ज्या पेपरफुटी प्रकरणावरून देशाचं राजकारण ढवळून निघालं त्या पेपरफुटी प्रकरणांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आज संसदेत सुधारित 'अँटी-पेपर लीक' विधेयक मांडणार आहे. या प्रस्तावित कायद्याअंतर्गत परीक्षांचे पेपर लीक करणे किंवा संघटित कॉपी संस्था चालवणाऱ्या दोषींना ५ ते १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि ५० लाख रुपयांपासून ते १० कोटी रुपयांपर्यंतच्या मोठ्या दंडाची कठोर तरतूद करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकरणांची जलद चौकशी करण्यासाठी विशेष कृती दल (STF) आणि विशेष जलद गती न्यायालये (Fast-Track Courts) स्थापन करून ३ महिन्यांत खटला पूर्ण करण्याचे उद्दिष्ट यात ठेवण्यात आले आहे, जेणेकरून स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता टिकून राहील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.