Mumbai Water Cut : पावसाळ्यातही मुंबईकरांचे हाल, आज पुन्हा पाणीकपातीचा फटका, किती आहे जलसाठा ?
Tv9 Marathi July 28, 2026 12:45 PM

मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील काही भागांमध्ये आज (28 जुलै) 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पांजरापूर येथील पंपिंग स्टेशनवर महत्त्वाचे तांत्रिक काम हाती घेण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागिरकांची मात्र चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता आहे. आजच्या पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे. ऐन पावसाळ्यातही पाणी कपात होत असल्यामुळे नागरिक मात्र चांगलेच त्रस्त झाले आहेत. आधीच मुंबईकरांना 10 टक्के पाणीकपात सहन करावी लागत आहे, त्यात आज पुन्हा आणखी पाणीकपातीचा फटाक बसल्याने, सर्वसामान्य नागरिक वैतागले असून अजून किती काळ पाणीकपातीचं संकट राहणार, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पांजरापूर पंपिंग स्टेशनमधील 6.6 के.व्ही. उच्चदाब नियंत्रण पॅनेल बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम 28 जुलै मंगळवार, म्हणजेच सकाळी 9 वाजल्यापासून 29 जुलै रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत मुंबईच्या काही भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे, मुंबईकर आधीच 10 टक्के पाणीकपातीचा सामना करत असताना आता तात्पुरत्या स्वरूपात 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. या पाणीकपातीमुळे नागरिकांना पाणीचंटाईचा सामना करावा लागू शकतो.

धरणांतील जलसाठा 88 टक्क्यांवर, तरीही पाणीकपात कायम

गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या धरणांतील एकूण जलसाठा 88 टक्क्यांवर पोहोचला असून त्यामुळे महापालिका प्रशासन आणि मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसाच्या अनिश्चिततेमुळे पाणीकपात तातडीने मागे घेण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. महापालिकेच्या माहितीनुसार, ऑक्टोबरपर्यंत पाणीकपात मागे घेण्याबाबत कोणताही निर्णय होणार नसून, परतीचा पाऊस समाधानकारक झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने पाणीकपात हटविण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही आठवडे तरी पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो. पाणीकपात मागे घेण्याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही.

मुंबईच्या जलप्रकल्पांना ‘हायटेक’ सुरक्षा कवच

दरम्यान, मुंबईच्या जलप्रकल्पांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेने अत्याधुनिक सीसीटीव्ही देखरेख प्रणाली उभारण्याचा निर्णय घेतला आहे. भांडुप येथे उभारण्यात येणाऱ्या 900 दशलक्ष लिटर क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पासह तुळशी जलशुद्धीकरण प्रकल्पात अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमधील सीसीटीव्ही प्रणालीचे संचालन आणि पुढील तीन वर्षांच्या सर्वसमावेशक देखभालीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, संवेदनशील जलप्रकल्पांवर 24 तास देखरेख ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.