Coforge Ltd Q1 Results: कंपनीकडून 4 रुपयांचा लाभांश जाहीर, शेअर्समध्ये एकाच दिवसात 10 टक्क्यांची दणदणीत तेजी
ET Marathi July 28, 2026 05:45 PM
आयटी शेअर्समध्ये पुन्हा एकदा जोरदार तेजीचे वारे वाहू लागले आहेत, भारतीय शेअर बाजारात आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'कोफोर्ज लिमिटेड'च्या शेअरने मंगळवारी बाजारात धुमाकूळ घातला. कंपनीचे चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे (Q1) निकाल जाहीर होताच शेअरच्या किमतीने तब्बल १० टक्क्यांपेक्षा जास्त मोठी झेप घेतली. गुंतवणूकदारांसाठी दुग्धशर्करा योग म्हणजे निकालांसोबतच कंपनीने लाभांशाची (Dividend) घोषणा करून भागधारकांना खूश केले आहे.
कमाई आणि महसुलाचा आलेख उच्चांकावर२८ जुलै रोजी बाजारातील व्यवहारादरम्यान Coforge Ltd चा शेअर १५६५.०५ रुपये या पातळीवर उघडला होता. पण तिमाही निकालांचा सकारात्मक प्रभाव दिसताच शेअरने १६७९.१० रुपये ही दिवसभरातील सर्वोच्च पातळी (Intra-day High) स्पर्श केली.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल ५५२७.७० कोटी रुपये नोंदवला गेला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत महसुलात २४.२० टक्के एवढी भक्कम वाढ झाली आहे. तसेच या कालावधीत कंपनीचा (Net Profit) ५१८.६० कोटी रुपये राहिला आहे. महसुलातील ही वाढ आयटी क्षेत्रातील सध्याच्या परिस्थितीनुसार अत्यंत प्रभावी मानली जात आहे.
गुंतवणूकदारांसाठी लाभांशाची भेट२७ जुलै रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत २ रुपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या प्रत्येक शेअरवर ४ रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी कंपनीने ३ ऑगस्ट २०२६ ही रेकॉर्ड डेट (Record Date) निश्चित केली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, २०२५ मध्ये कंपनीने ५:१ या प्रमाणात आपल्या शेअरचे विभाजन केले होते, ज्यामुळे मूळ फेस व्हॅल्यू कमी होऊन २ रुपये झाली होती. तरीही कंपनीने सातत्याने आकर्षक लाभांश देऊन भागधारकांचा विश्वास टिकवून ठेवला आहे.
गुंतवणूकदारांना दिला भरघोस परतावाशेअरच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, गेल्या अवघ्या ३ महिन्यांत या शेअरने ३९ टक्क्यांची दमदार तेजी दाखवली आहे. गेल्या ३ वर्षांत पोझिशनल गुंतवणूकदारांना ७८ टक्के तर २ वर्षांत ३१ टक्के परतावा मिळाला आहे.
सगळ्यात थक्क करणारी बाब म्हणजे, ज्या गुंतवणूकदारांनी हा शेअर १० वर्षांपासून आपल्या पोर्टफोलिओमध्ये Hold ठेवला आहे, त्यांना तब्बल १६९८ टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. सध्या कंपनीचे बाजार भांडवल (Market Cap) ७४१०६ कोटी रुपये इतके असून ५२ आठवड्यांचा उच्चांक १९८८.९० रुपये तर नीचांक १००८.५० रुपये आहे.