लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
एबीपी माझा ब्युरो July 28, 2026 08:43 PM

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणावरून (NEET Paper Leak) लोकसभेत जोरदार रणकंदन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं दिसतंय. काँग्रेसच्या खासदार प्रियंका (Priyanka Gandhi) गांधी यांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? ते विद्यार्थी दहशतवादी होते का? असा संतप्त सवाल प्रियंका गांधी यांनी विचारला. तसेच राजीनामा दिलेल्या धर्मेंद्र प्रधान यांचे संसद परिसरात ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं, त्याची लाज वाटली पाहिजे, असंही प्रियंका गांधी म्हणाल्या. 

नीट पेपरफुटीमुळे देशभरातील वातावरण चांगलंच तापलं. त्यावर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीत आंदोलन करण्यात आलं. त्या आंदोलनामध्ये दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर आक्रमक झालेल्या आंदोलकांसमोर अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आणि धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा घेतला. यावरून आता संसदेमध्ये मोठा गदारोळ झाल्याचं दिसून आलं.

Priyanka Gandhi On NEET Paper Leak : कुणाच्या आदेशाने लाठीचार्ज? 

काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी हे सरकार शिक्षणव्यवस्थेसंबंधी गंभीर नसून ते फेल असल्याची टीका केली. आपल्या परीक्षा यंत्रणा फेल झाल्या असून विद्यार्थ्यांचा आता त्यावरचा विश्वास उडाला असल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्या. 

गांधीजींच्या मार्गावर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. तो कुणाच्या आदेशावरून करण्यात आला? पंतप्रधानांनी तो आदेश दिला की गृहमंत्र्यांनी तो आदेश दिला? असा सवाल प्रियंका गांधी यांनी विचारला.

देशाचे युवक हे न्याय मागण्यासाठी आले आहेत. जेन झी यांना रस्त्यावरून हटवलं जाऊ शकतं, पण त्यांच्या प्रश्नांना हटवू शकत नाही, असं प्रियंका गांधी म्हणाल्या. देशातील युवकांची मनं जिंकण्यासाठी मंत्र्यांनी इन्स्टाग्रामवर रील करून भागणार नाही. पंतप्रधानांनी आता कॅमेराचा अँगल बदलून उपयोग नाही तर त्यांचा हृदयाचा अँगल बदलावा, असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला. 

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी लोकसभेत म्हणाल्या, "सरकारने आरएसएसच्या प्रचारकांना शिक्षण व्यवस्थेत भरून ती पोकळ केली आहे. एनटीए (NTA) जबरदस्तीने आणून आणि व्यवस्थेचे केंद्रीकरण करून त्यांनी परिस्थिती आणखी गुंतागुंतीची केली आहे. देशाच्या एकूण अर्थसंकल्पातील शिक्षणावरील खर्च हा वाढण्यापेक्षा प्रत्यक्षात कमी होत आहे."

ही बातमी वाचा: 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.