नाशिक : शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात नाशिक गुन्हे शाखेने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी आणि भाजपचा पदाधिकारी असलेल्या संजय गरुड याला सोलापूर येथील एका फार्म हाऊसमधून नाशिक पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची तब्बल 160 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले असून, या संपूर्ण प्रकरणात 1200 संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत.
नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान नाशिक उपसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांतील 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावांचा गैरवापर करण्यात आल्याचे समोर आले आहे.
कोणतीही अधिकृत वैयक्तिक मान्यता नसताना मागील तारखेचे (Backdated) शालार्थ प्रस्ताव दाखवून नियुक्त्या करण्यात आल्या. तपासात आतापर्यंत 177 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर मान्यता दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात मुख्याध्यापक, संस्थाचालक, सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोलीकर याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने दिलेल्या कबुलीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. घोटाळ्यातील 841 संशयित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 438 संशयित हे एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे जळगावमधील अनेक बड्या शिक्षण संस्थाचालकांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करून सरकारची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नाशिकच्या सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आतापर्यंत 1200 संशयित निष्पन्न झाले असून त्यापैकी 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
संजय गरुड याच्या अटकेमुळे अनेक राजकीय पक्षांशी निगडित पदाधिकारी आणि शिक्षण संस्थाचालक असे बडे मासे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरल्याचा अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला असून, पोलीस तपासात आणखी कोणकोणती मोठी नावे समोर येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा: