Ankush Chaudhary On Not Accepting Hindi Movie Offer: मराठी सिनेसृष्टीतल्या (Marathi Film Industry) 'हँडसम हंक' अभिनेत्यांच्या यादीत आवर्जुन समाविष्ट होणारं नाव म्हणजे, अंकुश चौधरी (Ankush Choudhary). मराठी मनोरंजन (Marathi Entertainment) विश्वातला हा सुपरस्टार आजही अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत आहे, तर अनेक तरुणांचा आयकॉन आहे. अंकुश चौधरीनं आजवर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलंय. चाळीतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनयाचा श्रीगणेशा करत अंकुशनं नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली. म्हणता म्हणता हा अभिनेता प्रेक्षकांचा लाडका सुपरस्टार झाला.
आता अंकुश एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विजू माने (Director Viju Mane) दिग्दर्शित 'मामाच्या गोव्याला जाऊया' (Mamachya Govyala Jauya) सिनेमातून अंकुश चौधरी त्याच्या लाडक्या प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. याच सिनेमाच्या निमित्तानं अंकुश चौधरी आणि सिनेमातली इतर स्टारकास्ट दणक्यात प्रमोशन करताना दिसतेय. अशातच नुकत्याच 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अंकुश चौधरीनं हिंदी सिनेमांबाबत (Hindi Films) वक्तव्य केलंय. करिअरच्या सुरुवातीच्या काळात हिंदी सिनेमांमध्ये झळकलेला अंकुश चौधरी आता मात्र, हिंदी सिनेमांमध्ये दिसत नाही. यावरच्या प्रश्नावर उत्तर देताना अंकुश चौधरीनं अनेक ऑफर्स आल्यात, पण त्या मी नाकारल्या, असं सांगितलं. तसेच, हिंदी सिनेमांच्या ऑफर्स नाकारण्याचं कारणंही अंकुशनं बोलताना सांगितली.
अभिनेता अंकुश चौधरी नेमकं काय म्हणाला? (Ankush Choudhary On Hindi Film Industry)
मराठी अभिनेता अंकुश चौधरी म्हणाला की, "मला हिंदी सिनेमांच्या ऑफर्स आल्यात. पण, त्यातील बऱ्याच ऑफर्स या सपोर्टिव्ह रोलसाठी असतात. तसं मला करायचं नाही. जेव्हा आपण एखाद्या राज्याचे राजा असतो. तेव्हा दुसऱ्या ठिकाणी जाऊन काही करायची गरज नसते..."
मी माझ्या प्रेक्षकांमध्ये मी खूश आहे... : अंकुश चौधरी
पुढे बोलताना अंकुश चौधरी म्हणाला की, "माझ्यावर प्रेम करणारी प्रेक्षक मंडळी मी जमा केली आहेत, त्यांना सोडून मी दुसरीकडे जातोय आणि त्यांच्याकडून अपेक्षा करतोय, मला असं वाटतं की, मी माझ्या प्रेक्षकांमध्ये मी खूश आहे... त्यांच्यासाठी नवी भूमिका, नवं काम करायला मला आवडतं..."
दरम्यान, मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी आगामी सिनेमा 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमात झळकणार असून हा सिनेमा 31 जुलै रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात अंकुश चौधरी सोबतच अंकुश चौधरी, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, नेहा खान झळकणार आहेत. तर, मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज प्रवीण तरडे, महेश मांजरेकर, अवधूत गुप्ते, मकरंद अनासपुरे यांचा कॅमिओ फिल्ममध्ये असणार आहे.