हल्ली लहान मुलांमध्ये चिडचिड करणे आणि अचानक राग येणे या समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत. कारणे काहीही असोत, मुलांचा हा राग हाताळताना पालकांची मोठी कसरत होत आहे. असे चित्र अनेक घरात दिसून येत आहे. अशावेळी मुलांवर ओरडून किंवा त्यांना मारून त्यांचा राग शांत होत नाही, उलट ते अधिक हट्टी बनतात. मग अशा वेळी पालकांनी काय करायला हवे? मुलांचा राग समजावून घेऊन तो शांत कसा करायचा? जाणून घेऊयात यासंदर्भातील खास टिप्स
- मुलांच्या वागण्या-बोलण्यावर त्यांच्या पालकांचा प्रभाव असतो. जर तुम्ही स्वतः संयम आणि शांतता राखली तर मूलही तेच शिकेल. त्यामुळे मुलांना फटकारण्याऐवजी, प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा.
- मुलांचा राग हा भूक, थकवा, झोपेचा अभाव किंवा भावनिक असंतुलन यासारख्या अनेक कारणांमुळे असू शकतो. जेव्हा जेव्हा मुलांना राग येतो तेव्हा प्रथम त्यामागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
- मुलांना त्यांच्या भावना शब्दांत व्यक्त करण्यास प्रोत्साहित करावे. त्यांच्याशी मोकळेपणाने बोला आणि त्यांना शिकवा की राग येणे हा सामान्य मानवी स्वभाव आहे, परंतु तो योग्य पद्धतीने व्यक्त करणे महत्त्वाचे आहे.
- खेळ, धावणे, योगा, सायकलिंग किंवा इतर सर्जनशील क्रिया करण्यामध्ये मुलांची ऊर्जा वळवा.
- जेव्हा तुमच्या मुलाला राग येतो तेव्हा त्याला काही सेकंदांसाठी खोल श्वास घेण्यास सांगा. ताण कमी करण्यासाठी ही पद्धत खूप प्रभावी आहे.
- जास्त मोबाईल, टीव्ही किंवा व्हिडिओ गेम पाहिल्याने मुले चिडचिडी होऊ शकतात. यासाठी मुलांचा स्क्रीन टाइम कमी करावा.
- मुलांची एक पद्धतशीर दिनचर्या असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये पुरेशी झोप, संतुलित आहार आणि खेळण्यासाठी वेळ यांचा समावेश असावा.
- जेव्हा तुमचे मूल शांतपणे वागते तेव्हा त्याची प्रशंसा नक्की करा. यामुळे त्याला चांगले वागण्यासाठी अधिक हुरूप मिळेल.
- जर मुल रागात वस्तू फेकत असेल किंवा भांडत असेल तर त्याला त्याचा राग व्यक्त करण्यासाठी काही चांगल पर्याय द्या जसे की मनातल्या भावना कागदावर लिहून काढणे, चित्र काढणे आदी गोष्टी शिकवा.
- बऱ्याचदा मुले असुरक्षित वाटल्यामुळे रागावतात. अशा परिस्थितीत, त्यांना हे जाणवून द्या की तुम्ही नेहमीच त्यांच्यासोबत आहात.
हेही वाचा – स्टील ,प्लास्टीक की तांबे ? मुलांसाठी कोणती वॉटर बॉटल सेफ






