आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
विजय केसरकर, एबीपी माझा July 30, 2026 09:43 PM

Kolhapur Crime: कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. कोल्हापुरात कदमवाडी रोड येथील 'प्रतिमा हॉस्पिटल'चे संचालक डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाडला बेकायदेशीर गर्भपात करताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याच जिल्ह्यात गर्भपाताची कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाडने पोलादपूर, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि बीड येथे सिव्हिल सर्जन (जिल्हा शल्यचिकित्सक) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तसेच सेंट जॉर्ज हॉस्पिटल, मुंबई येथे अतिरिक्त अधीक्षक आणि पुण्यात सहाय्यक संचालक म्हणूनही त्याने काम पाहिले आहे. अशा हायप्रोफाईल डाॅक्टर गर्भपात रॅकेट सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

साहित्य जप्त आणि धक्कादायक खुलासा 

या धाडीदरम्यान पोलिसांनी बेकायदेशीर गर्भपातासाठी वापरले जाणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपाताची औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणे जप्त केली आहेत. प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपी डॉ. चंद्रकांत गायकवाड याने आतापर्यंत तब्बल 200 ते 250 बेकायदेशीर गर्भपात केल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी आरोपी डॉ. गायकवाड याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली असतानाच अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (CPR), कोल्हापूर येथे आंतररुग्ण (Inpatient) म्हणून दाखल करण्यात आले आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर करून त्याची पोलीस कोठडी (PCR) मंजूर करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बोगस डॉक्टर स्वप्नील पाटीलच्या कोठडीतून लागला सुगावा

26 जुलै रोजी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने कळंबा येथील 'श्री स्टार लॉज'वर धाड टाकून बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी स्वप्नील केरबा पाटीलला अटक केली होती. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी अश्विनी गजानन शिंदेनं अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला. स्वप्नील पाटीलकडून लिंगनिदान करून घेतल्यानंतर ज्या महिलांच्या पोटात मुलगी असल्याचे स्पष्ट व्हायचे, अशा महिलांचा गर्भपात भीम नगर हाऊसिंग सोसायटी, कदमवाडी रोड, कोल्हापूर येथील 'प्रतिमा हॉस्पिटल'मध्ये डॉ. चंद्रकांत गायकवाडमार्फत केला जात असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

डमी पेशंट पाठवून रचला सापळा

मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि पंचायत समिती करवीरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मदने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 'प्रतिमा हॉस्पिटल'वर सापळा रचला. पोलिसांच्या पथकाने एक डमी रुग्ण डॉ. गायकवाडकडे पाठवला. डॉ. गायकवाडने रुग्णाचा कोणताही केसपेपर अथवा अधिकृत नोंद न करता तिला थेट ॲडमिट करून घेतले. त्यानंतर स्वतःजवळील बेकायदेशीर पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भाची तपासणी केली आणि तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन बेकायदेशीर गर्भपात करण्याची तयारी दर्शवली. त्यावेळी दबा धरून बसलेल्या गुन्हे शोध पथकाने तत्काळ छापा टाकून डॉ. गायकवाड याला रंगेहात ताब्यात घेतले.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.