भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडून नियुक्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशच्या पक्षप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी ही घोषणा मंगळवारी केली. त्यांनी पंजाब आणि गुजरात या राज्यांसाठीही पक्षप्रभारींची नियुक्ती केली आहे. विनोद तावडे यांची सोमवारीच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने या सर्व निवडणुका महत्वाच्या आहेत. विशेषत: उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे राज्य असल्याने त्याचे महत्य विशेष आहे. या राज्याच्या प्रभारीपदी विनोद तावडे यांची नियुक्ती करुन त्यांना त्यांच्या कार्यक्षमतेची जणू पावतीच देण्यात आली आहे, असे मानले जात आहे. तावडे यांनी भारतीय जनता पक्षाला आपल्या प्रभारीपदाच्या काळात अनेक राज्यांमध्ये आजवर विजय मिळवून दिलेला आहे. तावडे यांना साहाय्य करण्यासाठी सहप्रभारी म्हणून जगदीश ईश्वरभाई पटेल यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणाही पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांनी केली आहे.
पंजाबचे प्रभारी पुनिया
पंजाबच्या प्रभारीपदी पक्षाकडून डॉ. संजय पुनिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 2027 च्या डिसेंबर महिन्यात गुजरातची विधानसभा निवडणूक होणार असून त्याच्या राज्याच्या प्रभारीपदी तरुण चुघ यांची नियुक्ती करण्यात आली. फेब्रुवारी-मार्चमध्ये ज्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यांच्यापैकी पंजाबकडेही यावेळी भारतीय जनता पक्षाने विशेष लक्ष पुरविण्याचा निर्धार केला आहे. डॉ. संजय पुनिया यांच्याकडे त्यामुळे मतदान केंद्र निहाय उत्तरदायित्व सोपविण्यात आले आहे. पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाची, त्याचा पूर्वीचा मित्रपक्ष असणाऱ्या अकाली दलाशी युती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र, अद्याप त्यावर अधिकृत भाष्य दोन्ही पक्षांकडून करण्यात आलेले नाही. तथापि, येत्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे.