मुंबई : मराठा आरक्षण (Marath reservation) आणि कुणबी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) पुन्हा आक्रमक झाले असून 29 ऑगस्ट रोजी त्यांनी उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. तसेच, गरज पडल्यास पुन्हा एकदा आपला मोर्चा मुंबईच्या दिशेने वळवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, दक्षिण मुंबईतील आंदोलनांसाठी राज्य सरकारने नवे नियम लागू केले आहेत. आझाद मैदानाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील (Mumbai) अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चा काढण्यास मनाई केली आहे. मराठे मुंबईत जाणार आहे, त्यामुळे मुद्दामून सरकारने हे केलं, यात झाकून ठेवण्यासारखं काहीच नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारला लक्ष्य केलं.
सरकार विरोधात जात आहे, लोकांनी यांना सत्तेवर बसवले, मराठ्यांनी यांना सत्तेवर बसवले. मात्र, त्याच गोरगरीब मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखणं म्हणजे विरोध वाढण्याचे कारण फक्त सरकार आहे. कायदा तुमच्या हातात आम्ही देतो, सत्ता आम्ही तुमच्या हातात देतो आणि तुम्ही त्याचा गैरवापर करता. लोक यासाठी तुम्हाला निवडून देतात की, आपण कसल्याही परिस्थितीत मुंबईला जरी गेलो, तरी आपलं सरकार तिथे आहे. आपले फडवणीस, आपले शिंदे, आपले दादा तिथे बसले आहेत. जे आपले म्हणून बसवले तेच मुंबईत येऊ नका म्हणतात, ही खूप मोठी दहशत झाली. ही सरकारची दादागिरी झाली, ही चालत नसते असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
आमच्यापुढे दादागिरी करायची नाही. मग, आम्ही मुंबईत सगळीकडं आंदोलन करत असतो, विरोध केला तर रेल्वे फिरू देणार नाही, तुमची विमानं उडू देणार नाही. आम्ही कुणाला मोजत नसतो आणि ऐकतही नसतो. आम्ही कायद्याचा सन्मान करतो, आम्ही तुम्हाला परवानगीचा अर्ज दिला आहे. तुम्ही परवानगी द्या, नाहीतर नका देऊ. मी जात असतो, आमचं जायचं ठरल तर मी जाणार, रात्रंदिवस बसणार तुम्ही काय करणार ते आम्ही बघणार? तुम्ही मुंबईत कसे अडवतात हे पण बघतो, असे म्हणत मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलन करणारच अशी ठाम भूमिका मांडली.
तुम्हाला मुंबईत अडथळा नको तर आमचे प्रश्न सोडवा, तुम्हाला प्रश्न सोडवायचे नाही तर सत्तेतही बसायचं नाही. मुंबईतील बांधवांनी समजून घ्यावे, आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल का? एखाद्या वेळेस नक्की होईल. मात्र, आम्हाला दहा-पंधरा दिवस सांभाळून घ्या, आम्ही तुमचेच आहोत, लोकाचे नाही. मुंबईत कोणीच सुखी नाही, आम्ही त्यांना नीट करायला यायला लागलो. जर ठरलं तर मुंबईत येणार, वर्षावरच येणार, तुमच्या बापाची पेंड आहे का? इकडे येऊ नको, तिकडे येऊ नको म्हणायला, असे म्हणत जरांगे पाटलांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, अशा नोटीसा पाठवणं म्हणजे लोकांवर जुलूम नाही का? असा सवालही पाटलांनी विचारला.