MPSC Drug Inspector Paper Leak Case : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Food And Drug Inspector) पद भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक आणि चक्रावून टाकणारे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि नंदुरबार येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अमृत पाटील यांना यापूर्वी राज्यस्तरीय 'उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले होते. आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांशी तब्बल 12 लाख रुपयांत पेपर खरेदीचा सौदा केला होता, ज्यातील 5 लाख रुपये त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.
मात्र, 22 मार्च रोजी पार पडलेल्या या परीक्षेला बसलेल्या 40 हजार प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर या पेपरफुटीमुळे पाणी फेरलं आहे. ही पेपरफुटी एका वादग्रस्त 'लव्ह स्टोरी' आणि 'ब्रेकअप'मुळे समोर आली.
या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणामागे एक नाट्यमय लव्ह-हेट स्टोरी समोर आली आहे. अमृत पाटील यांनी कौटिल्य अकादमीच्या प्रवीण पाटील या दलालाच्या मदतीने 22 मार्चच्या परीक्षेच्या दोन दिवस आधी मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासाठी प्रश्नपत्रिका मिळवली.
ऋतुजाने प्रेमापोटी हा फुटलेला पेपर तिचा बॉयफ्रेंड आणि MPSC चाच अभ्यास करणारा विद्यार्थी गौरव पाटील उर्फ लोकेश याला दिला. मात्र निकाल जाहीर झाल्यावर ऋतुजा पाटील उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली, मात्र तिचा प्रियकर गौरव पाटील अपात्र ठरला.
ऋतुजा आता अधिकारी होईल आणि आपल्यापासून दूर निघून जाईल या भीतीपोटी, तसेच लग्नाला नकार दिल्याच्या रागातून गौरवने थेट एमपीएससीकडे पेपरफुटीची तक्रार केली.
तक्रार दाखल केल्यानंतर गौरवने दुसऱ्याच दिवशी 'मी अपात्र ठरल्याने मुद्दाम बनाव रचला होता' असा ई-मेल करून तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता आणि चौकशीची चक्रे फिरली होती. पोलिसांनी या प्रकरणात तक्रारदार गौरव पाटील आणि शिक्षकासह एकूण 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर ऋतुजा पाटील हिला अद्याप अटक करण्यात आली नसून पोलिसांनी तिला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
TET, NEET आणि आता MPSC च्या या पेपरफुटी सत्रामुळे दिवसरात्र अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला असून आयोगाच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ही बातमी वाचा: