स्वदेशी कंपन्यांकडून खरेदी वाढणार : संरक्षण मंत्रालयाकडून स्वदेशीकरणाची 6 वी यादी जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने स्वदेशी कंपन्यांकडूनच संरक्षण सामग्री खरेदी करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. संरक्षण मंत्रालयाने स्वदेशीकरणाची सहावी यादी जारी केली असून यात 405 उत्पादने सामील आहेत आणि ही उत्पादने केवळ भारतीय पुरवठादारांकडूनच खरेदी करण्यात येणार आहेत. या यादीत सुटे भाग, उपप्रणाली, लाइन रिप्लेसेबल युनिट आणि कच्चा माल सामील असून त्यांचे स्वदेशीकरण केले जाईल आणि भारतीय उद्योगांकडूनच ते खरेदी करण्यात येणार आहे.
संरक्षण उत्पादन विभागाने सहावी ‘पॉझिटिव्ह इंडियजनायजेशन लिस्ट’ (पीआयएल) जारी केली आहे. या यादीत 405 रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण सामग्री सामील असून त्यांच्यासाठी अनुमानित 3070 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही सहावी पीआयएल आत्मनिर्भर भारत पुढाकाराच्या अंतर्गत संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेला बळ देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये आणखी एक पाऊल आहे.
या 405 उत्पादनांपैकी 16 भारतीय तटरक्षक दलाशी संबंधित आहेत, तर 389 उत्पादने संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांशी निगडित आहेत. स्वदेशीकरणाच्या सहाव्या यादीत महत्त्पूर्ण संरक्षण प्लॅटफॉर्म सामील आहे. यादीत सामील प्रत्येक उत्पादनाच्या स्वदेशीकरणासाठी एक संकेतात्मक कालमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. स्वदेशी विकास यशस्वी झाल्यावरच या उत्पादनांची खरेदी भारतीय उद्योगाकडून करण्यात येणार आहे.
हेलिकॉप्टर, सुखोईचे सुटे भाग
-स्वदेशीकरणाच्या यादीत अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टर, लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर, सुखोई-30एमकेआय, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आणि एएल-31एफपी इंजिन यासारखे एअर प्लॅटफॉर्म सामील आहे.
-यादीत टी-72, टी-90 आणि बीएमपी-2 यासारख्या चिलखती प्लॅटफॉर्मसोबत युद्धनौका आणि कोंकर्स-एम, इनवार आणि एमआरएसएएम सारखी क्षेपणास्त्र प्रणालीही सामील आहे.
-यादीत डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये रडार, सोनार, फायर कंट्रोल सिस्टीम, उपग्रह संचार प्रणाली सामील आहे. हाय एक्सप्लोसिव्ह अँटी-टँक अॅम्युनेशन आणि इतर आवश्यक संरक्षण उपकरणांचा समावेश आहे.
पुढाकारात कोणाचा समावेश?
या पुढाकारात भारतीय उद्योग खासकरून सुक्ष्म, मध्यम अन् लघू उद्योगांची (एमएसएमई) भागीदारी असेल. सृजन पोर्टलवर 33 हजारांहून अधिक संरक्षण उत्पादने सादर करण्यात आली आहेत. सहाव्या पीआयएल अंतर्गत संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देण्यात आले आहे. यामुळे भारतीय उद्योगासाठी संधी निर्माण होतील, देशांतर्गत संरक्षण उत्पादन इकोसिस्टीमला मजबुती मिळेल आणि गुंतवणूक तसेच नवोन्मेषाला चालना मिळणार आहे.
2020 मध्ये सृजन पोर्टल सादर
संरक्षण विभागाने ऑगस्ट 2020 मध्ये सृजन डिफेन्स पोर्टलचा शुभारंभ केला होता. हा डीपीएसयू आणि सर्व्हिस हेडक्वार्टरसाठी एक खास प्लॅटफॉर्म आहे. भारतीय उद्योगांना देशात निर्मित संरक्षण उत्पादनांचे सादरीकरण यावर करता येते. जून 2026 पर्यंत या पोर्टलद्वारे डीपीएसयू आणि एसएचक्यूने देशात निर्माण करण्यासाठी 33 हजारांहून अधिक संरक्षण उत्पादनांची यादी जारी केली आहे.
युद्धामुळे पुरवठासाखळीत समस्या
पश्चिम आशिया संकट आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय संरक्षण दलांच्या अनेक उपकरणांच्या पुरवठासाखळीत अडचणी निर्माण झाल्या आहेत. भारतीय वायुदलाला सुखोई-30एमकेआय लढाऊ विमानांसाठी सुट्या भागांची आवश्यकता आहे.