मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरदूद
प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा August 19, 2026 02:43 PM

Mira Bhayandar News मिरा भाईंदर : मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारती आणि हाउसिंग सोसायट्यांमध्ये आता कुर्बानी देण्यासोबतच बकरा पाळण्यावरही बंदी घालण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजपने (BJP) मंगळवारी झालेल्या महासभेत यासंदर्भातील प्रस्ताव बहुमताच्या आधारे मंजूर केला. प्रस्तावानुसार, सोसायटी परिसर, घर, दुकान आणि रस्त्यावर बकरा पाळणे अथवा कुर्बानी करणे यावर प्रतिबंध राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर 25 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यासोबतच गुन्हा (Crime) दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Mira Bhayandar News : नेमकं प्रकरण काय

गेल्या दोन वर्षांपासून मीरा-भाईंदरमध्ये सणांच्या काळात सोसायट्यांमध्ये बकरा पाळणे आणि कुर्बानी देण्यावरून अनेक वाद निर्माण झाले आहेत. एखाद्या रहिवाशाने सोसायटीमध्ये बकरा आणल्यास इतर रहिवाशांकडून विरोध केला जात असल्याने अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनांमुळे शहरात दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन राजकीय वातावरणही तापले होते. अशातच, स्पष्ट नियमांच्या अभावामुळे प्रशासनासमोर कारवाई करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे स्थानिक पातळीवर स्पष्ट नियमावली तयार करण्याची मागणी होत होती. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या महासभेत मांस विक्रीशी संबंधित नियमावलीवर चर्चा करताना भाजपकडून सोसायटी, घर, दुकान आणि रस्त्यावर बकरा पाळणे तसेच कुर्बानी करण्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. सत्ताधारी पक्षाच्या बहुमतामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

Mira Bhayandar News : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसोबतच गुन्हा दाखल करण्याची तरतूद

मात्र, या निर्णयाला विरोधकांनी विरोध केला आहे. काँग्रेसने मागणी केली की, ज्या सोसायट्यांमध्ये सर्व रहिवाशांची संमती असेल, त्या सोसायट्यांना बकरा पाळण्यास किंवा सोसायटी परिसरात कुर्बानी करण्यास प्रतिबंधातून वगळण्यात यावे. काँग्रेसने यासंदर्भात प्रस्तावही मांडला, मात्र बहुमत न मिळाल्याने तो नामंजूर करण्यात आला. महासभेत मंजूर झालेल्या प्रस्तावामुळे आता मीरा-भाईंदरमधील सोसायट्या, घरे, दुकाने आणि रस्त्यांवर बकरा पाळणे तसेच कुर्बानी करण्यावर निर्बंध येणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसोबतच गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.