देवरुख आगाराचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर, देवरुख-रत्नागिरी मार्गावर एसी’ गाडी पडली बंद
Marathi August 19, 2026 03:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘भाडे वातानुकूलित गाडीचे, पण प्रवास मात्र घाम गाळत भररस्त्यात ताटकळण्याचा!’ एसटीच्या देवरुख आगाराचा बेजबाबदार आणि मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जादा पैसे उकळूनही प्रवाशांना रस्त्यावर सोडणाऱ्या देवरुख आगाराच्या नादुरुस्त ‘एसी’ गाडीने गुरुवारी सायंकाळी प्रवाशांची पुरती वाट लावली.

देवरुख आगारातून सायंकाळी 5.30 वाजता रत्नागिरीसाठी सुटलेली ‘हायफाय’ एसी बस अवघ्या अर्ध्या तासात, म्हणजे सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आंबव कॉलेजजवळ येताच धापा टाकू लागली आणि भररस्त्यात बंद पडली. कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांची आणि विद्यार्थ्यांची यामुळे मोठी त्रेधा उडाली. देवरुख आगाराने सध्या प्रवाशांच्या खिशावर दरोडा घालण्याचेच धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. प्रवाशांना विचारणा न करता अचानक साध्या गाड्या रद्द करून महागड्या एसी गाड्या मार्गावर ढकलल्या जातात. पर्याय नसल्याने प्रवाशांना जादा तिकीट दर मोजावे लागतात. पूर्ण भाडे उकळल्यानंतरही गाड्यांची अवस्था मात्र भंगार! प्रवाशांना नाहक ताटकळत राहावे लागते.
च्या
पैसे पूर्ण घेऊन प्रवाशांना रस्त्यात वाऱ्यावर सोडणाऱ्या देवरुख आगाराच्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ प्रशासन काय कारवाई करणार, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. हा मनमानी कारभार थांबला नाही, तर आगाराच्या या ‘लुटारू’ कारभाराविरोधात थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.