Toxic Box Office collection: यश आणि कियारा अडवानीचा पॅन इंडिया चित्रपट ‘टॉक्सिक’वर (Toxic) समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आणि टीकेचा सामना करावा लागला असला, तरी प्रेक्षकांनी मात्र या गँगस्टर ड्रामाला (Box Office Collection) पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद दिला आहे. 26 ऑगस्ट 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने काही तासांतच बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातलाय. आता ओणमच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘टॉक्सिक’च्या पहिल्या दिवसाची संपूर्ण कमाई समोर आली आहे. या आकड्यांनी सर्वांनाच धक्का बसला आहे. पहिल्याच दिवशी यशच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एवढी जोरदार कमाई केली आहे की, आता ‘धुरंधर 2’च्या रेकॉर्ड यशचा 'टॉक्सिक' सहज मोडू शकेल असं चित्र निर्माण झाले आहे.
पहिल्याच दिवशी ‘टॉक्सिक’चा दबदबा
‘टॉक्सिक’चा रिलीजपूर्वीचा आवेश पाहता, हा चित्रपट पहिल्या दिवशी 80 ते 100 कोटी रुपयांची कमाई करेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रेक्षकांच्या या अपेक्षांवर चित्रपट खरा उतरल्याचे दिसत आहे.
Sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, ‘टॉक्सिक’ने बुधवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर तब्बल 101.10 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. तर चित्रपटाची एकूण ग्रॉस कमाई 140.75 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हे चित्रपटाचे सुरुवातीचे आकडे आहेत.
‘टॉक्सिक’ची विविध भाषांमधील कमाई
हिंदी : 55 कोटी रुपये
कन्नड : 23.30 कोटी रुपये
मल्याळम : 1.30 कोटी रुपये
तमिळ : 5.50 कोटी रुपये
तेलुगू :16 कोटी रुपये
‘धुरंधर 2’चा रेकॉर्ड मोडण्यासाठी फक्त 2 कोटींची गरज?
यशच्या ‘टॉक्सिक’ने रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ला कमाईच्या बाबतीत आधीच मागे टाकल्याचा दावा केला जात आहे. आता जर चित्रपटाची कमाई 102 कोटी रुपयांच्या पुढे गेली, तर ‘धुरंधर 2’च्या ओपनिंग डे कलेक्शनचा रेकॉर्डही मोडला जाऊ शकतो. ‘धुरंधर 2’ने पहिल्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 102 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले होते.
‘टॉक्सिक’ला केवळ भारतातच नाही, तर परदेशातील प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ओव्हरसीज मार्केटमध्ये सुमारे 20 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. भारतात या चित्रपटाला एकूण 24,514 शोज मिळाले आहेत.