धक्कादायक! नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण, पत्नीनं पाच मुलांसह सोडलं घर, एकाच तलावात आढळले सहा जणांचे मृतदेह  
विलास अध्यापक, एबीपी माझा August 28, 2026 12:43 AM

Vijayapura News : कर्नाटकमधील विजयपूरमध्ये ( Vijayapura Karnataka)  धक्कादायक घटना घडली आहे. विजयपूरच्या (Vijayapura ) ऐतिहासिक भूतनाळ तलावात सहा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन लहान मुले, तीन मुली आणि महिला यांचे मृतदेह तलावात मिळाले आहेत. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.

24 ऑगस्ट पासून हे सर्वजण बेपत्ता होते

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार 24 ऑगस्ट पासून हे सर्वजण बेपत्ता होते. आज या सर्वांचे मृतदेह एकाच तलावात मिळाल्याने चर्चेचा विषय बनला आहे. विजयपूर तालुक्यातील तोरवी गावातील शोभा जालगेरी (45), विद्या (16) सुवर्णा (14), गौडेश (10), विकास (5) आणि सानिका (7) अशी मृतदेह सापडलेल्यांची नावे आहेत. शोभा यांचे त्यांचे पती मलकारी भीमराय जालगेरी याच्याशी कडाक्याचे भांडण झाले होते. भांडण झाल्यावर आपण आत्महत्या करते असे सांगून शोभा मुलांच्या समवेत घरातून बाहेर पडली होती अशीही माहिती समोर आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी घटनास्थळी भेट दिली. आदर्शनगर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

भांडण झाल्यावर रागाच्या भरात शोभा हिने मुलांना घेऊन घर सोडले होते

विजयपूर ग्रामीण पोलीस स्थानकात 24 तारखेला सहा जण बेपत्ता झाल्याची तक्रार मलकारी भीमराय जालगेरी याने दिली होती. श्रावण सोमवार पूजा आणि स्वयंपाक या विषयावरुन पती मलकारी आणि पत्नी शोभाचे भांडण झाले होते. भांडण झाल्यावर रागाच्या भरात शोभा हिने मुलांना घेऊन घर सोडले होते. त्यानंतर गुरुवारी तलावात मृतदेह सापडल्यावर या बेपत्ता व्यक्तीचा तपास लागला अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी माध्यमाशी बोलताना दिली.

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना, 75 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात घरणी शिवारात रस्त्याच्या बाजूला 75 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सय्यद हाकानी तांजपाशा, वय अंदाजे 75 वर्षे, रा. रेहमतनगर, चाकूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12.15 वाजण्यापूर्वी घरणी शिवारातील रस्त्याच्या बाजूला त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू दाखल करण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस निरीक्षक बी. आर. भंडे यांच्या आदेशाने पोलीस हवालदार आर. डी. वाघमारे पुढील तपास करीत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.