मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ, पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? भारतावर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
गणेश लटके September 10, 2026 10:43 PM

Crude oil Price : कच्च्या तेलाच्या (Crude oil ) संदर्भात एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पुन्हा सुरु झाल्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 105 डॉलरवर पोहोचल्या आहेत. दरम्यान, या कच्च्या तेलाच्या वाढत्या दराचा परीणाम भारतावर काय होणार का? पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का?  असा सवालही उपस्थित केला जात आहे. 

भारतावर परिणाम होणार का?

होर्मुझची सामुद्रधुनी जगभरातील कच्च्या तेलाच्या आयातीचा स्रोत आहे. भारत हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश असून, त्याच्या कच्च्या तेलाचा एक मोठा हिस्सा याच मार्गाने येतो. त्यामुळे, कच्च्या तेलाच्या किमतीतील कोणत्याही चढ-उताराचा भारतावर थेट परिणाम होतो. फेब्रुवारीच्या अखेरीस युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत, मे महिन्यात तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सलग चार वेळा वाढ झाली, जी एक मोठी वाढ होती.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ होणार का? 

जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत होत्या आणि कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती, तेव्हा मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चार वेळा वाढ करण्यात आली. जरी भारत कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश असला तरी, तो पूर्णपणे एकाच देशावर अवलंबून नाही. अनेक देशांमधून भारतात कच्चे तेल येते, त्यामुळे कोणत्याही एका देशाच्या मार्गावरील अवलंबित्व टाळले जाते.

देशाकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा 

दरम्यान, कच्च्या तेलाच्या जागतिक किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे, भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील अशी जोरदार चर्चा आहे. ही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. मात्र, गेल्या काही महिन्यांतील परिस्थिती लक्षात घेता, सरकारनेही तयारी केली आहे. देशाकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे याचा इंधनाच्या किमतींवर परिणाम होणार नाही अशी शक्यता आहे.

रुपयाही घसरला

जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना, तेल कंपन्यांना मोठे नुकसान होत आहे. यामुळे केवळ डॉलरच मजबूत झाला नाही, तर रुपया कमकुवत झाला आहे. आज, भारतीय रुपया 0.2 टक्केने घसरून प्रति डॉलर 95.30 वर आला, जी जवळपास 10 दिवसांतील नीचांकी पातळी आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.