सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप पूर्णपणे बदलले. उत्सव कमी, व्यापार आणि भूकंपाप्रमाणे ध्वनिवर्धकाचे हादरे जास्त. मोठ्या उद्योगपतींची ‘कार्पोरेट’ स्पर्धा गिरणगावातल्या गणपती उत्सवात सुरू झाली. मराठी माणूस हतबल आहे. बहुधा ‘श्रीं’ची तीच इच्छा दिसते.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप पूर्णपणे बदलते आहे. त्या परिवर्तनावर मुंबई-पुण्यासारख्या शहरांत वादविवाद सुरू आहेत. ज्या कारणांसाठी लोकमान्य टिळकांनी हा ‘उत्सव’ सुरू केला ती कारणे मागे पडली व आता उत्सवाच्या निमित्ताने भलत्याच संस्कृतीचे दर्शन घडत आहे. 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. लोकजागृती, समाजाचे ऐक्य हा त्यावेळचा उद्देश होता. नंतर त्याची जागा मनोरंजनाने घेतली. आता उत्सवांचा ताबा उद्योगपती, बिल्डर व राजकीय पक्षांनी घेतला. ‘शक्ती आणि पैसा’ हे सार्वजनिक उत्सवांचे मुख्य साधन झाले आहे. त्याला कोणताही उत्सव अपवाद नाही. उत्सवांचे पूर्ण व्यापारीकरण झाले. ‘लालबागचा राजा’ या मुंबईतील गणेशोत्सवास उद्योगपती अंबानी यांचे पाठबळ आहे म्हणून टीका सुरू होती. त्या स्पर्धेत आता गौतम अदानी यांनी त्यांचा घोडा फिरवला. चिंचपोकळीच्या 90 वर्षे जुन्या ‘चिंतामणी’ गणेशोत्सवावर अदानी यांनी नियंत्रण मिळवले. ‘एक गणपती त्यांचा आणि एक गणपती आमचा’ अशी सरळ वाटणी झाली. मुंबईच्या गिरगावातील गणेशोत्सवाला चौफेर जिओ व अदानी यांचे होर्डिंग्ज आणि फलक, जाहिराती लागल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव हा आनंदाचा लोकोत्सव होता, तो तसा आता राहिलेला नाही. उद्योगपतींचे कार्पोरेट जग त्यात घुसले व त्या माध्यमातून मार्केटिंग सुरू झाले. लालबागच्या राजाला सिनेक्षेत्रातील सर्व दिग्गज, केंद्रातले मंत्री, राज्याराज्यांचे मुख्यमंत्री उपस्थिती लावतात. आता ‘चिंतामणी’वर अदानी उद्योगाची मेहेरबानी झाल्याने पहिल्या दिवसापासून गृहमंत्री अमित शहांपासून सर्व सत्ताधारी तेथे येतील. श्री. अदानी हे तेथे मुक्कामच ठोकतील. त्यामुळे चित्रपटसृष्टीचे नायक-महानायक पोहोचतील. उद्योगपतींनी हिंदूंच्या देवांना, मराठमोळ्या गणेशोत्सवाला स्वतःचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवले. पुण्यातही यापेक्षा वेगळे चित्र नाही.
बापटांचा भूकंप
पुण्यातील गणेशोत्सव या वेळी विद्यानंद बापट या तरुणाने गाजवला. त्याचे पडसाद राज्यात उमटले. सार्वजनिक उत्सवांतील मिरवणुकांत कानाचे पडदे फाडणारा व हृदयाचे ठोके बंद करणारा ‘भूकंपी’ डीजे बंद करण्यासाठी बापट यांनी मोहीम सुरू केली. उत्सवप्रेमी पुणेकरांनी या मोहिमेस पाठिंबा दिला. बापट यांच्यावर एका माथेफिरूने हल्ला केला तरी बापटांचा लढा थांबला नाही. बापट यांच्या समर्थनार्थ पुणेकरांनी मोर्चा काढला. जेथे टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली त्या पुण्यातला एक मोठा वर्ग उत्सवातील गोंगाटाला, भूकंपाच्या ध्वनी हादऱ्यांना कंटाळला आहे. असंख्य पुणेकर भूकंपाच्या ध्वनी हादऱ्यांच्या भीतीने या काळात ‘पुणे’ सोडून दुसरीकडे जातात. हे भूकंपाचे हादरे म्हणजेच ‘हिंदुत्व’ असे सध्याच्या पिढीला वाटते. त्यांना पैसा पुरवतात ते छोटे-मोठे उद्योगपती. या सगळ्या उत्सवांतून जागोजागी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. अदानींसारखे लोक तोटा सहन करून धर्मकार्य करतील किंवा उत्सव साजरा करतील असे वाटत नाही. आताचे गणेशोत्सव हे लोकवर्गणी आणि देणग्यांतून साजरे होत नाहीत. जोपर्यंत उत्सव वर्गणीतून साजरे होत असत, तोपर्यंत उत्सवांतील सांस्कृतिक पावित्र्य कायम राहिले. आता त्या त्या भागांतले ‘एसआरए’ प्रकल्प, बिल्डर हे उत्सव साजऱ्या करणाऱ्या मंडळांस मोठ्या रकमा देतात. त्या बदल्यात जुन्या-मोडक्या चाळी व इमारतींचा ताबा घेतात आणि त्या जागेवर उत्सव साजरे करून स्वतःची प्रतिमा दयावान, धर्माभिमानी अशी करतात. या सगळ्या उलाढालीत मुंबईची संस्कृती आणि मराठीपण पुसले जात आहे. धनिकांच्या खैरातीवर उत्सवांची स्पर्धा व मोठेपण आज टिकून आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार हे भ्रष्टाचारातून गडगंज पैसे मिळवतात. ठेकेदारांचे शोषण करतात व आपापल्या भागात ‘भूकंपा’सारखे डीजे वाजवून ‘उदो उदो’ करून घेतात. आज तरुण बेरोजगार आहे, पेपरफुटीमुळे बेजार आहे, त्याचे आई-बाप महागाईने त्रस्त आहेत. मुंबई सोडून गरीब-मध्यमवर्गीयांना विरार-अंबरनाथच्या पुढे निवारा शोधावा लागतोय. कारण त्यांच्या मूळ घरांवर बिल्डरांनी ताबा घेतला आहे. तेथे सध्या दहीहंडी ते गणेशोत्सवाचे मोठे उत्सव सुरू आहेत. ही सध्याच्या सार्वजनिक उत्सवांची दुसरी काळीकुट्ट बाजू आहे.
व्यापार आणि रोजगार
‘लालबागचा राजा’सारखी मंडळे वर्षभर सामाजिक कार्य करतात. शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम राबवतात. आता अदानींच्या अधिपत्याखालील ‘चिंतामणी’ गणेशही हे उपक्रम राबवील. महाराष्ट्रातील अनेक गणेश मंडळे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. लालबागच्या राजाच्या संस्थेचे ‘डायलिसिस’चे काम मोठे आहे. उत्सवांचे महत्त्व असे की, रोषणाई, गाणे वाजवणे, मनोरंजन, खानपान यांवर मोठा खर्च होतो व त्यातून अनेकांना काम मिळते. रोजगाराचे आणि अर्थार्जनाचे ते एक साधन आहे. सार्वजनिक उत्सवांत मोठ्या उद्योगपतींचा पैसा येत असेल तर तो पैसा अडवा, पैसा जिरवा, सामाजिक कार्याकडे वळवा. त्यातून मराठी माणसाच्या संस्थांना बळ द्या.
मराठी माणसाच्या अभ्युदयाकरिता उत्सवातील ‘पै पै’चा वापर होऊ द्या. बहुधा ‘श्रीं’ची तीच इच्छा असावी. नाहीतरी धनिकांच्या अरेरावीपुढे ‘श्री’ काय करणार?
ट्विटर – @rautsanjay61
Gmail- [email protected]