EPFO Balance Check : कंपनी पीएफचे पैसे तुमच्या खात्यात जमा करतेय की नाही? असं करा चेक
Times Now Marathi September 08, 2024 06:45 AM

EPFO Passbook Balance Check: कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी सुविधा पुरवते. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या एकूण पगारापैकी 12 टक्के योगदान पीएफ खात्यात जमा केले जाते. तसेच कंपनी स्वतःच्या वतीने तेवढीच रक्कम जमा करते. कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी ही खूप चांगली आणि सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तुम्हाला या रकमेवर सरकारकडून वार्षिक व्याज देखील मिळते. त्यामुळे नोकरदार लोकांसाठी भविष्याच्या दृष्टिकोणातून ही एक महत्त्वाची महत्त्वाची मालमत्ता असते.

परंतु अनेकदा काही कंपन्या पीएफचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करत नाहीत आणि कर्मचाऱ्यांना देखील याची माहितीही नसते. तुमची कंपनी देखील पीएफ खात्यात पैसे जमा करत नसेल किंवा ते देण्यास टाळाटाळ करत असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार देखील करू शकता. परंतु नियोक्ता तुमचे पीएफचे पैसे तुमच्या पीएफ खात्यात जमा करत आहे की नाही हे कसे कळेल? हेच आम्ही आज या लेखात सांगत आहोत.

पीएफचे पैसे कसे कापले जातात?
कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफचे पैसे कापण्याचा एक नियम आहे. या नियमानुसार तुमच्या मूळ पगाराच्या आणि डीएच्या 12 टक्के रक्कम पीएफ म्हणून कापली जाते. याशिवाय तुमचा नियोक्ताही त्याच्या बाजूने 12 टक्के योगदान देत असतो. म्हणजेच तुमच्या एकूण पगाराच्या 24 टक्के रक्कम तुमची पीएफ खात्यात जमा होत असते. नियोक्त्याने जमा केलेल्या या 12 टक्के रकमेपैकी कंपनी 3.67 टक्के रक्कम तुमच्या पीएफ खात्यात जमा होते आणि उर्वरित 8.33 टक्के रक्कम पेन्शन योजनेत जमा केली जाते.

पैसे जमा झाले की नाही कसे कळेल?
नियोक्ता तुमच्या खात्यात पैसे जमा करत आहे की नाही याची माहिती तुम्हाला तुमच्या पीएफ पासबुकवरून मिळू शकते. या पासबूकमध्ये तुमच्या सर्व कंपन्यांच्याचा पीएफ जमा केलेल्या रकमेचा हिशोब तुम्ही पाहू शकता. हे पासबुक तपासण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ईपीएफओ पोर्टलवर जावे लागेल आणि तेथे लॉगिन करावे लागेल. परंतु हे लक्षात घ्या की यासाठी तुमचा UAN क्रमांक सक्रिय असणे आवश्यक आहे.

पासबूक तपासण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो
  • पीएफ पासबूक तपासण्यासाठी सर्वप्रथम EPFO वेबसाइटवर जा आणि 'Our services' टॅबवर जा
  • यानंतर तुमच्या समोर आलेल्या पर्यायांपैकी 'For employees' हा पर्याय निवडा.
  • यानंतर तुम्ही 'Member Passbook' वर क्लिक करा.
  • यानंतर तुमचा सक्रिय असलेला UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • यशस्वीरित्या लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमची ईपीएफ शिल्लक तपासण्यास सक्षम असाल.
  • यामध्ये तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक आणि अतर सर्व तपशील पाहू शकता.
मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या बॅलन्स
  • मिस्ड कॉलद्वारे ईपीएफ मधील बॅलन्स चेक करण्यासाठी ईपीएफओवर टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे.
  • यासाठी तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून 9966044425 किंवा 011-22901406 या क्रमांकावर कॉल करा.
  • मिस्ड कॉल प्राप्त होताच, पीएफ खात्याचे डीटेल्स एसएमएसद्वारे तुमच्या नंबरवर पाठवले जातील.
  • लक्षात ठेवा की, तुम्हाला हा मिस कॉल वर दिलेल्या त्याच नंबरवर करावा लागेल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.