Duleep Trophy 2024 : इंडिया बी आणि सी यांच्यातील सामना ड्रॉ, पण ऋतुराज गायकवाडच्या संघाचा असा झाला फायदा
GH News September 15, 2024 07:10 PM

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामने नुकतेच पार पडले. बीसीसीआयच्या कठोर भूमिकेमुळे देशांतर्गत क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. दिग्गज खेळाडू या स्पर्धांमध्ये खेळताना दिसत आहेत. इंडिया बी संघाचं नेतृत्व अभिमन्यू ईश्वरन आणि इंडिया सी संघाचं नेतृत्व ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर आहे. या दोन्ही संघांनी या स्पर्धेतील पहिला सामना जिंकला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तुल्यबल लढत होईल यात शंका नाही. झालंही तसंच..हा सामना अनिर्णित ठरला आहे. नाणेफेकीचा कौल इंडिया बी संघाच्या बाजूने लागला आणि कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात इशान किशन आमि मानव सुथारने जबरदस्त खेळी केली. इशानने 111 धावा केल्या. तसेच मानव सुथारने 82 धावांची खेळी केली. या खेळीमुळे संघाला 525 धावांपर्यंत मजल मारता आली. या धावांचा पाठलाग करताना इंडिया बी अडखलला. पण कडवी झुंज दिली.

कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने 286 चेंडूंचा सामना केला आणि नाबाद 157 धावांची खेळी केली. तर नारायन जगदीशन याने 70 धावा केल्या. तिसऱ्या दिवसापर्यंत पहिल्या डावात खेळ चालल्याने ड्रॉ होणार हे निश्चित होतं.या डावात अंशुल कंबोजने 69 धावा देत 8 गडी बाद केले. इंडिया बी संघाचा डावा 332 धावांवर आटोपला. पण इंडिया सी संघाकडे 193 धावांची आघाडी होती. या धावांपुढे खेळतान इंडिया सी संघाने 4 गडी बाद 128 धावा केल्या. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला. पण हा सामना ड्रॉ झाला असला तरी फायदा ऋतुराजच्या संघाला झाला.

ऋतुराजच्या सी संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवून 6 गुणांची कमाई केली होती. तसेच दुसरा सामना ड्रॉ झाला असला तरी पहिल्या डावात 193 धावांची आघाडी होती. गुणतालिकेतील आकडेवारीनुसार, सामना ड्रॉ झाला असला तरी पहिल्या डावात आघाडी असलेल्या संघाला 3 गुण मिळतील. तर दुसऱ्या संघाला 1 गुण मिळेल. त्याप्रमाणे इंडिया सी संघाला 3 गुण मिळाले असून 9 गुण झाले आहेत. तर इंडिया बी संघाला 1 गुण मिळाल्याने 7 गुण झाले आहेत. सध्या गुणतालिकेत ऋतुराजचा संघ अव्वल स्थानी आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.