आनंदसोहळ्याचा कळसाध्याय
esakal September 17, 2024 03:45 AM

पुणे, ता. १६ : गणेश चतुर्थीपासून सर्वत्र सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या आनंदसोहळ्याचा कळसाध्याय मंगळवारी (ता. १७) विसर्जन मिरवणुकीने गाठला जाणार आहे. लाडक्या गणरायाला वाजतगाजत आणि दिमाखदार मिरवणुकीने निरोप देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मानाच्या गणपतींसह सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुकीसाठी आकर्षक रथ, पालख्या आदींची सज्जता केली आहे.
दहा दिवस मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केल्यानंतर आता गणेशभक्तांना वैभवशाली विसर्जन मिरवणुकीचे वेध लागले आहेत. गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर त्याला निरोपही तितक्याच दिमाखात देण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. अनंत चतुर्दशीला मंगळवारी (ता. १७) सकाळी १०.३० वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. सर्वप्रथम मानाचे पाच गणपती लक्ष्मी रस्त्यावरून मार्गस्थ होतील. प्रत्येक मंडळासमोर कोणते बँडपथक आणि ढोल-ताशा पथक असणार, मिरवणूक कशी मार्गक्रमण करणार, याचे नियोजन करण्यात आले आहे. पोलिस आणि महापालिका प्रशासनदेखील मिरवणुकीसाठी सज्ज झाले आहे.

मानाचा पहिला ग्रामदैवत श्री कसबा गणपती
श्री कसबा गणपती मंडळाच्या गणपतीची मिरवणूक पारंपरिक चांदीच्या पालखीतून निघणार आहे. सकाळी १०.३० वाजता आरती झाल्यानंतर बेलबाग चौकातून मिरवणूक मार्गस्थ होईल. मिरवणुकीची सुरुवात नगारखान्याने होणार असून, यात गायकवाड यांचे सनईवादन आणि देवलंकर बंधूंचे चौघडावादन होईल. रमणबाग, रुद्रगर्जना, परशुराम ही ढोल-ताशा पथके, ९० वर्षांपेक्षा अधिक काळ सहभागी होणारा प्रभात बॅण्ड आणि ‘बँक ऑफ इंडिया’ व ‘कामायनी’ यांची पायी दिंडी मिरवणुकीत सहभागी होणार आहे.

मानाचा दुसरा ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणरायाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून काढण्यात येणार आहे. ‘विष्णूनाद’चे कार्यकर्ते पालखीपुढे शंखनाद करणार आहेत. अग्रभागी सतीश आढाव यांचे नगारावादन असेल. न्यू गंधर्व ब्रास बॅण्ड, समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा आणि ताल ही ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत.

मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती
स्वप्नील सरपाले व सुभाष सरपाले यांनी साकारलेल्या फुलांच्या आकर्षक ‘सूर्य’ रथातून श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बॅण्ड, गर्जना, ‘नादब्रह्म - सर्व वादक’ आणि अतुल बेहरे यांचे ‘नादब्रह्म’ ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहे. तसेच, तृतीयपंथीयांचे ‘शिखंडी’ हे ढोल-ताशा पथकही सहभागी होईल.

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती
तुळशीबाग गणपती मंडळाच्या गणेशाची मिरवणूक ३२ फूट उंची असलेल्या आणि आकर्षक फुलांनी सजवलेल्या ‘जगन्नाथ पुरी’ रथातून काढण्यात येणार आहे. जगन्नाथ रथाप्रमाणे कार्यकर्ते हा रथ ओढणार असून, मेट्रो पुलाची उंची लक्षात घेऊन यात ‘हायड्रोलिक’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. अग्रभागी लोणकर बंधूंचे नगारा वादन आणि स्वरूपवर्धिनी व गजलक्ष्मी ही ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती
परंपरेप्रमाणे फुलांनी सजविलेल्या पालखीत केसरीवाडा गणपती मंडळाचे गणराय विराजमान असणार आहेत. मिरवणुकीत श्रीराम, शिवमुद्रा आणि आवर्तन ही ढोल-ताशा पथके, तसेच बिडवे बंधूंचा सनई-चौघडा असणार आहे. इतिहास अभ्यासक मोहन शेटे हे लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी होतील. विठ्ठलाची भव्य मूर्ती असलेला ‘माऊली’ रथ मिरवणुकीचे आकर्षण असणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
आकर्षक विद्युत रोषणाई असलेल्या श्री उमांगमलज रथामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान होणार आहेत. यंदाची प्रतिकृती असलेल्या जटोली शिवमंदिराच्या विषयाप्रमाणे मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली असून, रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली
भगवान शंकराची मूर्ती, त्याच्या बाजूला त्रिशूळ व डमरू आणि कळस म्हणून मोठा रुद्राक्ष असणार आहे. मिरवणुकीत रुग्णसेवा रथ अग्रभागी असणार आहे. प्रभात ब्रास बॅण्ड, दरबार ब्रास बॅण्ड, स्वरूपवर्धिनीचे ढोल-ताशा पथक, सनई-चौघडा हे सहभागी होतील. गतवर्षीप्रमाणेच यंदाही दुपारी चार वाजताच मंडळ मिरवणुकीत सहभागी होईल.

अखिल मंडई गणपती मंडळ
अखिल मंडई मंडळाची विसर्जन मिरवणूक ‘आदिशक्ती’ रथातून निघणार आहे. रौद्र रूपातील कालीमातेची १५ फूट उंचीची मूर्ती यात असेल. यंदा प्रथमच शारदा-गजाननाची मूर्ती ६० अंशात फिरणार असून,रथाची उंची कमी करण्यासाठी हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मंडळ मिरवणुकीत सायंकाळी सात वाजता सहभागी होणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन, त्यामागे गंधर्व बॅण्ड तसेच शिवगर्जना आणि शिवमुद्रा ढोल-ताशा पथकांचे वादन होणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.