सायनसवरील आजारांवर तपासणी
डेरवण रुग्णालय; दुर्बिणीद्वारे मोफत शस्त्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १९ : डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात सायनसवरील सर्व आजारांसाठी दुर्बिणीद्वारे मोफत शस्त्रक्रिया शिबिर २१ व २२ सप्टेंबरला आयोजित केले आहे. या शिबिराचा लाभ पिवळे, केशरी तसेच पांढऱ्या रेशनकार्ड धारकांना घेता येणार आहे. त्यासाठी रुग्णांची नोंदणी सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ज्या रुग्णांना सतत नाक चोंदणे, नाकाचे हाड वाढणे, ॲलर्जी, सतत सायनसमध्ये सर्दी साठणे, नाकातून पाणी येणे, डोळ्यांच्या अश्रू पिशवीतून सतत पाणी वाहणे, श्वास कोंडल्यामुळे रात्रीची झोप मोडणे, घोरणे, नाकातून रक्त येणे असा त्रास असेल त्यांनी वालावलकर रुग्णालयाच्या नाक-कान-घसा विभागात दाखवून योग्य निदान करून घ्यावे. या शिबिरातील सर्व शस्त्रक्रिया या दुर्बिणीद्वारे केल्या जाणार आहेत. त्यामुळे कुठेही चिरफाड न करता फन्क्शनल इंडॉस्कॉपिक सायनस सर्जरी या तंत्रज्ञानाचा वापर करून इथमोईड पोलिप, अंट्रो कोईनल पोलिप नाकाचे हाड वाढत असल्यास सप्टोप्लास्टी अशा विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या शिबिरासाठी मुंबईहून डॉ. मिलिंद नवलखे आणि सांगलीहून डॉ. सचिन निलाखे उपस्थित राहणार आहेत. शस्त्रक्रियांसाठी आवश्यक नामांकित कंपनीची दुर्बिणी, कोबलोटर, डिब्रिडर या सर्व यंत्रणा सज्ज आहेत याशिवाय कुशल तज्ज्ञ डॉ. राजीव केणी, डॉ. प्रतीक शहाणे आणि भूलतज्ञ उपस्थित असणार आहेत. रुग्णांनी त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.