Assembly Election 2024 : 80 नाही, 90 नाही, तर काँग्रेसला हव्यात तब्बल 'एवढ्या' जागा; ठाकरेंची शिवसेना अन् 'NCP' काय करणार?
Sarkarnama September 20, 2024 05:45 PM

लोकसभेतील यशानंतर काँग्रेसला भलताच 'कॉन्फिडन्स' आला आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही यश मिळणार असल्याचं विविध सर्व्हेतून समोर आलं आहे. त्यामुळे जास्तीत जागा आपल्याकडे घेण्यासाठी महाविकास आघाडीत चढाओढ सुरू आहे. सध्या महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी मुंबईत बैठका पार पडत आहेत. त्यात काँग्रेसनं 125 जागांवर लढण्याची तयारी दर्शवल्याची माहिती मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं 17 जागा लढविल्या होत्या. मात्र, शिवसेना ( ठाकरे गट ), राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षफुटीमुळे निर्माण झालेली सहानुभूती, संविधान बदलाची चर्चा आणि महायुती सरकारविरोधात असलेल्या वातावरणामुळे काँग्रेसच्या तब्बल 13 जागा निवडून आल्या. 2019 मध्ये काँग्रेसला फक्त 1 जागेवर विजय मिळाला होता.

पण, 2024 च्या लोकसभेत मिळालेल्या घवघवीत यशानंतर विधानसभेनंतर सत्ता स्थापन करणार असल्याचा 'कॉन्फिडन्स' काँग्रेसला आहे. तसेच, महायुती सरकारला घरी बसवायचं असेल, तर सर्वाधिक विश्वासार्ह पक्ष म्हणून काँग्रेसकडे बघितलं जात असल्याचं राज्यातील एका बड्या नेत्यानं 'सकाळ'ला सांगितलं. यात कोणताही अभिनिवेश नसून जनतेलाच काँग्रेस मोठा भाऊ म्हणून हवा असल्याचंही बड्या नेत्यानं नमूद केलं.

कसं आहे काँग्रेसचं गणित?

विदर्भ हा काँग्रेसला बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे काँग्रेसनं सर्वाधिक विदर्भातील जागांची मागणी केली आहे. विदर्भातील 38 ते 40 जागा त्याखालोखाल 25 ते 30 जागा, उत्तर महाराष्ट्रातील 20, पश्चिम महाराष्ट्रातील 20 जागा काँग्रेससाठी अनुकूल आहेत. काँग्रेस याच जागा जिंकू शकेल, असा अहवाल आहे. त्यामुळे किमान 125 जागा लढू द्यावे, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

दरम्यान, काँग्रेसची मागणी पूर्ण होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, काँग्रेसनं 125 जागा लढवल्या, शिवसेना ( ठाकरे गट ), राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) वाट्याला 163 जागा येऊ शकतात. यात अन्य घटकपक्षांनाही सामावून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपारून ओढाताण होण्याची शक्यता असून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.