IIFL Finance: आरबीआयने IIFL फायनान्सला दिला मोठा दिलासा; गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी मागे, कंपनीच्या शेअर्सवर होणार परिणाम
esakal September 20, 2024 05:45 PM

RBI On IIFL Finance: बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने IIFL फायनान्सला मोठा दिलासा दिला आहे. RBI ने IIFL Financeच्या गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी मागे घेतली आहे. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजकडे नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

IIFL फायनान्सने स्टॉक एक्स्चेंजकडे नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 सप्टेंबर 2024 रोजी IIFL फायनान्स लिमिटेडच्या गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी उठवण्यात आली आहे. 4 मार्च 2024 रोजी, आरबीआयने IIFL फायनान्सला गोल्ड लोन मंजूर करण्यावर, वितरण किंवा विक्री करण्यावर बंदी घातली होती.

कंपनीने एक्सचेंजला सांगितले की आरबीआयचा हा निर्णय ताबडतोब लागू झाला आहे आणि नियमांनुसार, कंपनीला गोल्ड लोन मंजूर करणे, वितरण, असाइनमेंट, सिक्युरिटायझेशन आणि सोन्याच्या कर्जाची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आरबीआयने बंदी का घातली होती?

4 मार्च 2024 रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने IIFL फायनान्सला गोल्ड लोन मंजूर आणि वितरणावर बंदी घातली होती. कंपनीला विद्यमान गोल्ड लोन पोर्टफोलिओ सुरू ठेवून संकलन आणि वसुली प्रक्रिया सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली.

आयआयएफएलच्या गोल्ड लोन पोर्टफोलिओमध्ये कर्ज मंजूर करताना आरबीआयला सोन्याची शुद्धता आणि वजन यामध्ये गंभीर अनियमितता आढळून आली होती. आरबीआयला कर्जाच्या गुणोत्तरामध्येही तफावत आढळून आली होती.

त्यानंतर कंपनीवर ही कारवाई करण्यात आली होती. आरबीआयने बंदी घातल्यानंतर आयआयएफएलच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. आता आरबीआयने बंदी मागे घेतल्यानंतर पुन्हा कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.