IND vs BAN: टीम इंडियाकडे 308 धावांची आघाडी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला
GH News September 20, 2024 09:10 PM

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. बांगलादेशला पहिल्या डावात 149 धावांवर ऑलआऊट करत टीम इंडियाने 227 धावांची मोठी आघाडी घेतली. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 विकेट्स गमावून 81 धावा केल्या आहेत. यासह टीम इंडियाकडे 308 धावांची मजबूत आघाडी झाली आहे. खेळ संपला तेव्हा शुबमन गिल आणि ऋषभ पंत ही जोडी नाबाद परतली.

दुसऱ्या दिवशी काय झालं?

टीम इंडियाकडून आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने 6 बाद 339 धावांपासून दुसऱ्या दिवशी खेळायला सुरुवात केली. मात्र बांगलादेशने टीम इंडियाला 70-80 मिनिटातच 4 धक्के देत ऑलआऊट केलं. टीम इंडियाचा पहिला डाव हा 376 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून आर अश्विन याने सर्वाधिक 113 धावा केल्या. तर जडेजा आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी अनुक्रमे 86 आणि 56 धावांचं योगदान दिलं. या व्यरिक्त इतर कुणालाही काही खास करता आलं नाही. बांगलादेशकडून हसन महमूद याने 5 विकेट्स घेतल्या. तास्किन अहमद याने तिघांना बाद केलं. तर नाहीद राणा आणि मेहदी हसन या जोडीने 1-1 विकेट घेतली.

बांगलादेशचा पहिला डाव

त्यानंतर 376 धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचे फलंदाज भारतीय माऱ्यासमोर फ्लॉप ठरले. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 150 धावाही करु दिल्या नाहीत. बांगलादेशचा पहिला डाव हा 47.1 ओव्हरमध्ये 149 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने चौघांना बाद केलं. मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

टीम इंडियाचा दुसरा डाव

दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. रोहित 5 धावा करुन बाद झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल 10 धावांवर आऊट झाला. विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र विराटला 17 धावांपेक्षा जास्त योगदान देता आलं नाही. विराट बाद झाल्याने टीम इंडियाची 19.2 ओव्हरमध्ये 3 बाद 67 अशी स्थिती झाली. त्यानंतर ऋषभ पंत आणि शुबमन गिल या दोघांनी खेळ संपेपर्यंत सावध खेळ केला. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 23 षटकात 3 बाद 81 धावा केल्या आहेत. पंत 12 आणि शुबमन गिल 33 धावांवर नाबाद आहेत. तर बांगलादेशकडून तास्किन अहमद, नाहिद राणा आणि मेहदी हसन मिराज या तिघांनी 1-1 विकेट घेतली आहे.

टीम इंडिया भक्कम स्थितीत

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.